पुणे, 6 जुलै : सत्तेत राहून शिवसेनेनं विरोधाची भूमिका घेतल्यानंतर भाजपने कोकणातील मातब्बर नेते नारायण राणे यांना जवळ केलं. त्यानंतर राणेंचा भाजप प्रवेश होता-होता राहिला. अखेर भाजपने नारायण राणे यांना राज्यसभेची खासदारकी देत खूश करण्याचा प्रयत्न केला. पण आता विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबतची युती निश्चित झाल्यानंतर भाजपने संधी साधत नारायण राणे यांना धक्का दिला आहे.
नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या मुद्द्यावर अभियंता प्रकाश शेडेकर यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर चिखल ओतला. त्यानंतर नोकरशाहीशी निगडित राज्यातील काही संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात होत्या. निवडणुकीच्या तोंडावर नोकरशाहीचा विरोध होऊ नये म्हणून भाजप नेते आणि महसूलमंत्री अभियंता शेडेकर यांच्या कुटुंबाची भेट घेत सरकार त्यांच्यासोबत असल्याचं दाखवून दिलं. भाजपने या खेळीद्वारे नारायण राणे यांनाही योग्य तो संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
अभियंत्याच्या कुटुंबाला भेट दिल्यानंतर काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रकाश शेडेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. 'सरकार तुमच्या पाठीशी असून चुकीचे काम करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,' अशी ग्वाही त्यांनी शेडेकर कुटुंबाला दिली. 'जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा होणार आणि सरकार अधिकाऱ्यांच्या पाठिशी आहेत. शेडेकर यांना पोलीस संरक्षण दिले असून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणार आहोत,' असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
काय आहे नितेश राणे आणि अधिकाऱ्यामधील वाद?
मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांविरोधात कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी (4 जुलै)रोजी आक्रमक आंदोलन केलं. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मिळून हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाचे पाणी ओतले. इतकंच नाही तर शेडेकर यांना शिवीगाळ करत खांबाला बांधून ठेवण्याचा प्रयत्नदेखील केला. या प्रकारामुळे नितेश राणेंवर चौफेर टीका केली जात आहे. नितेश यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीदेखील घडल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. याबाबत नारायण राणे यांनी स्वतः माफीदेखील मागितली. तसंच 'नितेशनं केलेलं कृत्य चुकीचं होतं. मी त्याचं समर्थन करत नाही',असंही राणे यांनी म्हटलं.
नितेश राणेंची काय आहे भूमिका?
चौपदरीकरणाचं काम सुरू असलेल्या मुंबई-गोवा हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी रस्ता खचल्याच्या घटना देखील घडल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. मुंबई-गोवा हायवे चौपदरीकरणाच्या कामाची दखल कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी घेतली आणि थेट आंदोलन केलं. यावेळी त्यांनी सर्विस रोड का नाही बांधला? गोव्यामध्ये सर्विस रोड होतो मग कणकवलीत का नाही? असा सवाल अभियंता शेडेकर यांना विचारला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाचं पाणी ओतून त्यांना खांबाला बांधण्याचा प्रयत्न देखील केला. यावेळी नितेश राणे यांनी 15 दिवसात समस्या सोडव, अशी तंबी देखील अभियंता प्रकाश शेडेकर यांना दिली.
नितेश राणेंवर कारवाईची मागणी
अधिकाऱ्यांना चिखलाने आंघोळ घालणाऱ्या आमदार नितेश राणे यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित संघटनेने केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून संघटनेनं ही मागणी केली आहे. नितेश राणे यांना जामीन मिळू नये यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे.
जामीन फेटाळला
मुंबई-गोवा महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उपअभियंत्याच्या अंगावर केलेली चिखलफेक राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या चांगलीच अंगाशी आली आहे. कणकवली कोर्टाने नितेश राणे यांचा जामीन फेटाळला आहे. नितेश राणेंसह इतर आरोपींना कोर्टाने 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर चिखल फेकला. तसेच शेडेकर यांना आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी गडनदी पुलाला बांधून ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना काल अटक करण्यात आली होती. नितेश राणे आणि त्यांच्या जवळपास 50 समर्थकांवर कलम 353, 342, 332, 324, 323, 120(अ), 147, 143, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नितेश राणेंसह सर्व आरोपींना काल दुपारी 3 वाजता कोर्टात हजर करण्यात आले. या प्रकरणावर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. अखेर कोर्टाने नितेश राणे यांच्यासह सर्व आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours