सोलापूर, 27 जुलै : 'आमचे सरकार आल्यावर खासगी आणि शासकीय नोकरीत स्थानिकांसाठी 75 टक्के जागा राखीव ठेवणार आहोत. तसंच सत्तेत येताच याबाबतचा कायदा करू,' असं आश्वासन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (शुक्रवार) सोलापुरात बोलताना दिलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न चर्चेत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच आपल्या पक्षाच्या ध्येय-धोरणात याच मुद्द्याला अधिक महत्त्व दिलं आहे. अशातच आता अजित पवार यांनीही सरकारी आणि खासगी कंपन्यांनमध्ये रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्याचं आश्वासन दिलं आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी अजित पवार शुक्रवारी सोलापुरात होते. यावेळी त्यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करत सत्ता आल्यास राष्ट्रवादीकडून या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काय केलं जाईल, याबाबतही भाष्य केलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
'पीक विम्याबाबत शिवसेना मोर्चे कसले काढतीय?कर्जमाफी केली तर आम्ही कौतुक करू. कर्जमाफी हे नवे गाजर दाखवलं. निवडणुका जिंकण्यासाठी या घोषणा सुरू आहेत. सरकारच्या उदासीन धोरणामुळे रुपाली पवारची या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. मी या सरकारचा धिक्कार करतो. इतर घटकातील मुलांप्रमाणे खुल्या गटातील मुलांना शिक्षणासाठी सवलत मिळायला हवी. शैक्षणिक कर्जासाठी स्टेट बँकेच्या मॅनेजरने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे रुपालीला आत्महत्या करावी लागली. आमचे सरकार आल्यावर खासगी आणि शासकीय नोकरीत स्थानिकांना 75 टक्के जागा राखीव ठेवणार,' असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours