मुंबई, 06 जुलै: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवडणुकीला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी नागपूरमधून विजय मिळवला होता. या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. विशेष म्हणजे गडकरी यांनी 2019च्या निवडणुकीत पटोले यांचा 1.97 लाख मतांनी पराभव केला होता. निवडणुकीच्या निकालानंतर आता पटोले यांनी दोन महिन्यांनी गडकरी यांच्या विजयावर आक्षेप घेतला आहे.
यासंदर्भात नाना पटोले यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान गडकरी यांनी आयोगाने दिलेल्या नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. गडकरी यांनी नियमांचे पालन न केल्यामुळे ही निवडणूक रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे. पटोले यांनी ही याचिका केंद्रीय निवडणूक आयोग, आयोगाचे काही अधिकारी आणि नितीन गडकरी यांच्या विरुद्ध दाखल केली आहे.
गडकरींच्या विरुद्ध आरोप करण्याची किंवा त्यांच्या विजयाबद्दल प्रश्न उपस्थित करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील नाना पटोले यांनी गडकरींच्या विजयावर आक्षेप घेतले आहेत. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर त्यांनी स्ट्रॉग रुमच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी इतके कमी व्यवस्था ठेवल्यामुळे शंका निर्माण होत असल्याचे ते म्हणाले होते. मतमोजणी झाल्यानंतर पटोले यांनी निवडणूक प्रक्रियेचे पालन न केल्याचा आरोप केला होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours