सांगली, 10 जुलै : 'आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर या दोन नेत्यांनी एकत्र येवून भाजपला शह द्यावा,' अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आहे. तसंच आगामी निवडणुकीत सर्व विरोधकांनी एकत्र आल्यास सत्ताधारी युतीचा पराभव करणं शक्य असल्याचा विश्वासही राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचितने स्वतंत्र चूल मांडल्याने आघाडीला मोठा फटका बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तरी हे मतविभाजन टाळलं जावं, अशी राजू शेट्टी यांची इच्छा आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनाविरोधी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावं, अशी शेट्टी यांची इच्छा आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने मनसेला आघाडीसोबत घेण्याच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा गती मिळाली आहे. राजू शेट्टी यांनी मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी शेट्टींचा पुढाकार घेतला आहे. काँग्रेस आता तरी मनसेला सोबत घेणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. स्वाभिमानीकडूनही या चर्चांना दुजोरा मिळाला आहे.

राजू शेट्टी यांनी 'कृष्णकुंज'वर जाऊन राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोन्ही पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे महाआघाडीत मनसेला सामावून घेण्याच्या राजकीय चर्चांना पुन्हा वेग आला आहे. विशेष म्हणजे खुद्द राजू शेट्टी यांनी मनसेला सोबत घेण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीनेही यापूर्वीच मनसेला विधानसभेसाठी सोबत घेण्याची भूमिका जाहीरपणे मांडली होती. अशातच आता स्वाभिमानीनेही त्यासाठी आग्रह धरल्याने विरोधकांची मोट आणखी बळकट होऊ शकते. पण त्यासाठी काँग्रेस हायकमांडने हिरवा कंदिल दाखवणे तितकेच महत्त्वाचे आहे. तरंच हे राजकीय समीकरण जुळून येऊ शकते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours