नवी दिल्ली, 15 जुलै : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. या भेटीत महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकारणीत फेरबदल करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभवातून काँग्रेसने चांगलाच धडा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल करण्यात आला. त्यामुळे आता इतरही पदांवर तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. आता काँग्रेसमध्ये नक्की कोणते बदल करण्यात येणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
'लोकशाही आणि पुरोगामी मुल्य टिकवण्यासाठी आताचं सरकार घालवायचं आहे. हे सरकार घालवण्यासाठी सर्वांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर सोबत आहोतच पण वंचित आघाडी आणि मनसेलाही आगामी निवडणुकीत सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे,' अशी भूमिका बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे.
बाळासाहेब थोरातांचा निर्धार
'प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. या जबाबदारीत यशस्वी होणार आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात आघाडीचं सरकार येणार,' असं म्हणत काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours