मुंबई, 31 जुलै : भारतीय संघाला वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर संघाच्या निवड समितीवर अनेकांनी टीका केली होती. त्यानंतर विंडीज दौऱ्यासाठी करण्यात आलेल्या निवडीवरूनही टीका झाली. सध्या निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांच्या क्रिकेटच्या अनुभवावरून टार्गेट करण्यात आलं. याबद्दल त्यांनी पहिल्यांदाच मत व्यक्त केलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली बाजू मांडली.
भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी निवड समितीचे प्रमुख कमकुवत असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी विराटकडेच कर्णधारपद कायम ठेवल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. निवड समिती इतक्या कमी वेळात कशी निवड करते असंही गावस्कर यांनी म्हटलं होतं. निवड समितीत असलेल्या 5 सदस्यांना फक्त 13 कसोटी खेळण्याचा अनुभव आहे.
निवड समितीत असलेल्या सदस्यांच्या अनुभवाबद्दल सांगताना प्रसाद म्हणाले की, सर्व सदस्य वेगवेगळ्या प्रकारचे क्रिकेट खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय प्रथम श्रेणीत 477 सामने खेळले आहे. आमच्या कार्यकाळात आम्ही सर्वांना मिळून 200 पेक्षा जास्त सामन्यांचा अनुभव आहे. हे आकडे पाहून आम्ही एक खेळाडू आणि निवडकर्ता म्हणून चांगलं कौशल्य ओळखू शकत नाही असं तुम्हाला वाटत नाही का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
निवड समितीच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना प्रसाद यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की आमच्या संघाने 13 कसोटी मालिकेपैकी 11 मध्ये विजय मिळवला आहे. तसेच गेल्या 3 वर्षांत आयसीसीच्या क्रमवारीत कसोटी संघ नंबर एकवर आहे. जर तुम्ही सर्वाधिक सामने खेळलात त्यावर तुमची योग्यता ठरणार असेल तर इंग्लंडच्या निवड समितीचा अध्यक्ष असलेल्या एड स्मिथकडे फक्त एका कसोटीचा अनुभव आहे.
ऑस्ट्रेलियाचे ट्रेवोर होन्स यांच्याकडे 7 कसोटींचा अनुभव असून 128 कसोटी आणि 244 वनडे खेळणाऱे मार्क वॉ त्यांच्या हाताखाली काम करतात. जर त्या देशात पद आणि आंतरराष्ट्रीय अनुभव हा मुद्दा नाही तर आपल्या देशात का नाही असा प्रश्न प्रसाद यांनी उपस्थित केला.
Post A Comment:
0 comments so far,add yours