कोल्हापूर, 8 ऑगस्ट : सांगली आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानं थैमान घातलं आहे. पाणी साचल्याने अनेक नागरिक घरातच अडकले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. कोल्हापूरमधील या पुराचा फटका मुंबईलाही बसला आहे. कारण कोल्हापूरमधून मुंबईत येणाऱ्या दुधाचा पुरवठा पुरामुळे बंद करण्यात आला आहे.
मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि ठप्प असलेल्या वाहतुकीमुळे कोल्हापुरातल्या दूध उत्पादन कंपन्यांनी दुधाचे संकलन थांबवले आहे.  कोल्हापूरवरून दररोज गोकुळचे 7-8 लाख लीटर दूध, वारणाचे 3-4 लाख लीटर दूध आणि त्यासोबतच चितळे आणि इतर कंपन्यांचे 2-3 लाख लीटर दूध मुंबईत येत असते. पण जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर हा दूधपुरवठा थांबवण्यात आला आहे.
कोल्हापूरमधून मुंबईत होणारा दूधपुरवठा
कोल्हापूरमधून दररोज लाखो लीटर दुधाचा पुरवठा मुंबईत होत असतो. कोल्हापूरमधून या दुधाचा मुंबई, ठाणे, वसई-विरार, पनवेल भागात पुरवठा केला जातो. आज हा दूध पुरवठा झाला नाही. मुंबईची दररोज दुधाची गरज ही 80 लाख  लीटरची आहे. यामध्ये अमूल 12 लाख लीटर दुधाचा पुरवठा करते. तर गोकुळ 6 लाख आणि वारणा 2 लाख लिटर दुधाचा पुरवठा करते.
कोल्हापूर-सांगलीमधून विविध कंपन्यांचे मुंबईत दररोज 13 लाख लीटर दूध दाखल होते. मुंबईमध्ये देशभरातून दररोज एकूण 55 लाख लीटर दूध पॅकिंग पिशव्यांमधून पुरवलं जातं, तर 25 लाख लीटर दूध टँकरद्वारे आणलं जातं.
पुराचा हाकाकार, बचावकार्य युद्धपातळीवर
सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील पूरस्थिती अजूनही गंभीर असली तरी मदत आणि बचाव कार्ययुद्ध पातळीवर सुरू आहे. कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग 4 लाख क्युसेकपर्यंत वाढवण्यात आल्याने पूरस्थिती नियंत्रणात येईल. विभागातील 1 लाख 32 हजार 360 पूरबाधितांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. बचाव व मदत कार्यावर प्रशासनाने भर दिला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours