मुंबई, 4 सप्टेंबर : देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक स्थितीत असल्याचा आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला आहे. मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्थेचा विकास मंदावला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मनमोहन सिंग यांनी केलेल्या विधानाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही समर्थन दर्शवलं आहे. ''आर्थिक मंदीवर भक्तांनी कितीही उलटे सुलटे सांगितले तरी सत्याचा कोंबडा आरवलाय व मौनीबाबा डॉ. मनमोहन सिंग यांनी सौम्य शब्दांत सांगितलेल्या सत्याचाही स्फोट झालाच आहे. अर्थव्यवस्थेला बूच लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अर्थव्यवस्थेचा संबंध पक्षनिधी, निवडणुका जिंकणे, घोडाबाजार वगैरेपुरताच उरला आहे. त्यातून 'देशाची व्यवस्था' नष्ट होत आहे. आर्थिक मंदीचे राजकारण करू नये व तज्ज्ञांच्या मदतीने देश सावरावा असे आवाहन मनमोहन सिंग या शहाण्या माणसाने केले आहे. त्यांचा सल्ला गांभीर्याने घेण्यातच राष्ट्राचे हित आहे'', अशा शब्दांत आपलं मत उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये मांडलं आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय?
- देशाच्या अर्थव्यवस्थेचे विघ्न काही दूर होताना दिसत नाही. उलट चिंतेत भर टाकणाऱया बातम्या येत आहेत. त्यात मनमोहन सिंग यांनी मंदीसंदर्भात भाष्य केले व भविष्यातील कठीण काळाची जाणीव करून दिली. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. अर्थव्यवस्था घसरली आहे व भविष्यात कोसळणार आहे असे जेव्हा मनमोहन सिंग सांगतात तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो.
- पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांच्या कर्तबगारीवर आमचा विश्वास आहे. त्यांनी देशाला शिस्त लावली आहे. मोदी जेव्हा पाकिस्तानला इशारे देतात, भविष्यात पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानला जोडण्याचे आश्वासन देतात तेव्हा देश त्यांच्यावर डोळे मिटून भरवसा ठेवतो. मोदी यांनी पाकिस्तानला धडा शिकविण्याचे ठरवले आहे. मोदी ते करून दाखवतील याबाबत आमच्या मनात शंका नाही, पण अर्थव्यवस्था व लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours