अहमदनगर, 27 सप्टेंबर: भ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णा हजारे ठामपणे उभे राहतात. अण्णा हजारेंनी आतापर्यंत भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून अनेक नेत्यांना जेलवारी घडवली. मात्र पहिल्यांदाच अण्णा हजारेंनी शरद पवार यांची पाठराखण करत त्यांना क्लीनचीट दिली आहे. अण्णांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारे सरकार आणि सरकारी यंत्रणा कामाला लागतात, हा नेहमीचा अनुभव आहे. तर दुसरीकडे ईडीनं गुन्हा दाखल केल्यानं शरद पवार अडचणीत आलेत. राज्य सहकारी बँकेतल्या घोटाळ्याप्रकरणी अण्णा हजारेंनी पुरावे सादर केले होते. मात्र त्या पुराव्यांमध्ये शरद पवार यांचं नावच नसल्याचं खुद्द अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं.

अण्णा हजारे शरद पवारांना क्लीनचीट देऊन थांबले नाहीत. तर माझ्याकडील पुरावे चौकशीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करुनही त्यांनी याप्रकरणी कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हे दाखल करायला हवेत, अशी मागणीही त्यांनी केली. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी आपल्याकडील पुराव्यांमध्ये शरद पवारांचे नाव नव्हते. तरीही त्यांचे नाव यामध्ये कसे आले हे आपल्याला माहिती नाही. पवारांचा जर याच्याशी संबंध नसेल आणि तरीही त्यांचे नाव पुढे आलं असेल तर या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असंही अण्णांनी स्पष्ट केलं. एकंदरीतच अण्णांच्या क्लीनचीटमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढणार हे नक्की.


शरद पवारांना ईडीने कोणतीही नोटीस पाठवली नसली तरी शरद पवार शुक्रवारी स्वतःहून ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. पण त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना ईडीच्या कार्यालयाकडे जमू नका, असं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे ईडी कार्यालयाच्या परिसरात शुक्रवारी कलम 144 म्हणजेच जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. शरद पवार यांनी पोलीस किंवा तपास यंत्रणा यांना सहकार्य करा, लोकांना त्रास होईल असे कोणतंही कृत्य करू नका, असं आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. तर शरद पवार शुक्रवारी दुपारी 2 वाजता ईडी कार्यालयात जाणार आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours