बीड 1 सप्टेंबर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजप आणि शिवसेनेत जाण्यासाठी रांग लागलीय. नेत्यांच्या या पक्षांतरावर ज्येष्ठ कम्युनिष्ट नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी सडकून टीका केलीय. ते म्हणाले, ज्यांच्या भानगडी आहेत, ज्यांचे घोटाळे आहेत, त्यांचे घोंगडे अडकले आहे. त्यावर पांघरून घालण्याकरताच नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत अशी टीका त्यांनी केलीय. भाजपाच्या गंगेत डुबकी मारून पवित्र होऊ असा या नेत्यांचा समज आहे. मात्र ती गंगाच मलिन झालेली आहे. अशी टीकाही आडम यांनी केलीय. समुद्रात नाव बुडताना उंदीर उडी मारतात तशी गत राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
कम्युनिस्ट पक्षाच्या बीड जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते कॉ.अशोक ढवळे, सीपीएमचे कॉ.उत्तम माने कॉ.पी.एस घाडगे, शेकापचे भाई मोहन गुंड, इत्यादी नेते उपस्थित होते. आडम पुढे म्हणाले, देशात आर्थिक बेरोजगारी आणि बेकारी वाढत आहे, कामगारांवर उपासमारीची वेळ येतेय, देशात 34 कोटी लोकांना फक्त एकाच वेळचं जेवणं मिळतं. पारले बिस्कीट कंपनी मधील कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली, शस्त्राअस्त्र बनवणाऱ्या कंपनी मधील कामगार कमी केली जात आहेत.
सरकारशी भांडून रक्त सांडून कामगारांसाठी कायदे केले गेले मात्र आज त्याच कायद्याची पायमल्ली होत आहे. खचून न जाता देशाच्या एकूण परिस्थितीला बदलण्यासाठी व्यवस्थे विरोधात बंड पुकारण्यासाठी, दोन हात करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे असं आवाहनही त्यांनी केलं.
Post A Comment:
0 comments so far,add yours