राजापूर : राज्यभर गाजलेल्या नाणार रिफायनरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलंय. हे वक्तव्य करत त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जोरदार उत्तर दिल्याचं बोललंत जातंय. नाणार रिफायनरी ही नाणारलाच झाली पाहिजे असं आमचं मत होतं मात्र इथं झालेल्या विरोधामुळे तो निर्णय थांबवावा लागला. आता लोकांची इच्छा असल्यास त्यावर पुन्हा चर्चा करण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य हे शिवसेनेला राजकीय उत्तर असल्याचं बोललं जातंय. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा मंगळवारी रात्री राजापूरला आली होती. त्यावेळी नाणार समर्थकांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं.
त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, नाणार ही ग्रीन रिफायनरी आहे. ही झाली असती तर इथल्या 1 लाख लोकांना रोजगार मिळाला असता. विकास झाला असता. मात्र विरोधामुळे हा निर्णय थांबवावा लागला. आज मी कुठली घोषणा करत नाही. मात्र  इथल्या लोकांना पुन्हा एकदा चर्चेला बोलावतो असं आश्वासन त्यांनी दिलं.
मुंबईतल्या आरे इथं होणार असलेल्या मेट्रो कारशेडबाबत उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्पही नाणारसारखाच जाणार असं म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांचं या प्रकल्पाला समर्थन आहे. त्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेत नाणारचं वक्तव्य केलंय. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेत यावरून कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours