नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातलं वातावरण अनुकूल नाही हे लक्षात आल्याने कमीत कमी नुकसान व्हावं यासाठी काँग्रेसने 'डिझास्टर मॅनेजमेंट'ला सुरुवात केलाय. यासाठी दिल्लीत एक खास योजना तयार केली जात असून त्यात राज्यातल्या 42 दिग्गज नेत्यांना विधानसभा निवडणूक लढविण्याचे आदेश काँग्रेस श्रेष्ठींनी दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. जे नेते कधीही विधानसभा निवडणूक लढले नाही अशा काही नेत्यांनाही विधानसभेच्या आखाड्यात उतरवलं जाऊ शकतं. मात्र श्रेष्ठींचा आदेश काँग्रेसचे हे नेते पाळतील का हाच खरा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक नेत्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. अंतर्गत वाद, मतभेद, पक्षातून सोडून जात असलेले नेते, खंबीर नेतृत्वाचा अभाव यामुळे राज्यात पक्ष संघटना खिळखिळी झाली आहे.
या विधानसभा निवडणुकीत फार काही हाती पडणार नाही याचा अंदाज आल्याने 'तन-मन-धना'ने किती नेते लढतील अशी शंका व्यक्त केली जातेय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राजीव सातव, संजय निरुपम, मिलिंद देवरा यांच्यासह सर्व अनेक ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी अशा दिल्या सूचना दिल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.
गेली पाच वर्ष सत्तेबाहेर राहिल्याने काँग्रेसचे आर्थिक स्रोत आटले आहेत. जे काही शिल्लक होते ते सत्ताधारी भाजपने बंद करून टाकले. त्यामुळे अनेक नेत्यांची कुचंबना होतेय. त्यातच राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर पक्षात एक पोकळी निर्माण झालीय. सोनिया गांधींकडे अध्यक्षपद आलं तरी त्या पूर्वीसारख्या सक्रिय राहिलेल्या नाहीत. त्यामुळे निर्णय प्रक्रियेला खूप वेळ लागतोय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours