मुंबई 23 ऑक्टोंबर : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता फक्त काही तास राहिलेत. अवघ्या काही तासांमध्ये राज्यातलं चित्र स्पष्ट होणार आहे. सर्वच एक्झिट पोल्समध्ये महायुतीला मोठं यश मिळणार असं सांगितलेलं आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. भाजप-शिवसेना 200 पार करणार असं जवळपास सगळ्याच एक्झिट पोल्सनी सांगितलंय. त्यामुळे भाजपने 24 तारखेच्या जल्लोषासाठी तयारी सुरू केलीय. मिठाई, फटाके आणि ढोल ताशांची सोय करण्यात आलीय. नरिमन पॉईंट इथं असलेल्या भाजपच्या मुख्यालयाबाहेर व्यासपीठही उभारण्यात येणार असून दिग्गज नेते इथे उपस्थित राहणार आहेत.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे सलग 11 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहण्याची संधी कुणाही नेत्याला मिळाली नाही. शरद पवार यांनी चार वेळा राज्याचं मुख्यमंत्रीपद भुषवलं मात्र त्यांना एकदाही सलग पाच वर्ष पूर्ण करता आली नाहीत. तो मान आता देवेंद्र फडणवीसांना मिळणार असून सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येणं ही मोठी राजकीय जमेची बाजू असणार आहे.
निकाल लागल्यानंतर भाजप मोठा जल्लोष करणार असून दिवाळीआधीच भाजप आतषबाजी करणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours