सिंधुदुर्ग, 3 ऑक्टोबर : माजी मुख्यमंत्री आणि कोकणातील वजनदार नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगत आहे. मात्र भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि पक्षातील काही दिग्गज नेत्यांचा विरोध यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळू शकला नाही. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वत: नारायण राणे यांचा भाजप प्रवेश होत नसला तरीही त्यांचे सुपुत्र नितेश राणे हे मात्र भाजपमध्ये दाखल होणार आहेत.
कणकवली येथील भाजप कार्यालयात नितेश राणे यांचा प्रवेश होणार आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल. तसंच नितेश राणे यांना उद्या भाजपाचा AB फॉर्म मिळण्याचीही शक्यता आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी याबाबत माहिती दिली आहे.
नारायण राणे आणि राजकीय वर्चस्वाचा संघर्ष
महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती सतत चर्चेत असतात. नारायण राणे हे त्यातलंच एक नाव. पण सध्या नारायण राणेंची राजकीय अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक राणेंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला. तसंच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे वैभव नाईक हे जाएंट किलर ठरले होते. त्यांनी थेट नारायण राणेंना पराभवाची चव चाखायला लावली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही निलेश राणेंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे, असं बोललं जाऊ लागलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours