मुंबई, 28 ऑक्टोबर: दिवाळी आली की साधारण परतीचा पाऊस संपून थंडीला सुरुवात होते. मात्र यंदा दिवाळीतही पाऊस असल्याचं पाहायला मिळत आहे. 24 ऑक्टोबरपासून कोकण किनारपट्टी आणि गोवा भागात क्यार वादाळाचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. तर या स्थितीमुळे पुढील 24 तासांत पावसाचा इशाराही काही ठिकाणी देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर विशेषत: सिंधुदुर्गातील अनेक गावांमध्ये समुद्राचं पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान झालं होतं. अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे कापणीला आलेली पिकं भुईसपाट झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत.
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या 5 जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यात इतर ठिकाणी रिमझिम पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
नागपुरात पडत असलेल्या पावसामुळे दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्यानं नागरिकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. दुसरीकडे यवतमाळमध्ये वादळीवाऱ्यासह पावसाचं थैमान सुरू असल्यानं सोयाबीन आणि कपाशीचं मोठं नुसान झालं आहे. प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
भुसावळसह परिसरात रविवारी दुपारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने याचा परिणाम बाजारपेठेवर झाला असल्याचे दिसून आलं. दिवाळीला लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी सकाळी बाजारात गर्दी केली होती मात्र अचानक दुपारी एक वाजल्यापासून पावसाने हजेरी लावल्याने विक्रेत्यासह नागरींकांची धावपळ सुरू झाली. ऐन सणासुदीच्या दिवसांत पाऊस पडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तर पावसाला वैतागलेल्या नागरिकांकडून सोशल मीडियावरही अनेक मीम्स आणि जोक्स व्हायरल होत आहेत. वाशिम जिल्ह्यात मानोरा,जउळका,मेडशी तामसी परिसरात पावसानं दमदार हजेरी लावली होती. भुसावळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे वाघुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने वाघुर धरणाचे 14 दरवाजे उघडले आहे. प्रतिसेंकद 27हजार क्युसेस वेगाने तापी नदीत पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशाराही देण्यात आला.
राज्यात काही ढिकाणी रिमझिम तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आहे. पुढील 24 तास पावसाचं सावट कायम असेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours