नाशिक: राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला होता. आता नाशिकमधील राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
राष्ट्रवादीच्या तिकिटावर बाळासाहेब सानप यांनी निवडणूक लढवली. याठिकाणी त्यांच्यासमोर भाजपचे उमेदवार ढिकले यांचे आव्हान होते. दोघांमध्ये चुरशीची लढत झाली. ढिकले यांना निवडणुकीत 86 हजार 304 मते मिळाली तर सानप यांना 74 हजार 304 मते मिळाली. निकाल लागून तीन दिवस होण्याआधीच बाळासाहेब सानप यांनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले.
निवडणुकीच्या प्रचारावेळी बाळासाहेब सानप यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्याचाच हा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे. सानप यांच्या शिवसेना प्रवेशाचा नाशिक महापालिकेच्या राजकराणावर परिणाम होणार आहे.
सानप यांच्या मदतीने नाशिक महापालिका काबीज करण्याच्या छगन भुजबळ यांच्या मनसुब्यांना यामुळे धक्का पोहचल्याचं म्हटलं जात आहे. सानप यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. सानप यांना हाताशी धरून महापालिकेतील सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी सेनेचा हा प्रयत्न असल्याची चर्चा रंगली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours