दुध, भाजीपाला, औषधे व गॅस सिलेंडर या अत्यावश्यक सेवा नियमित सुरु
दुचाकी वाहने चालान होणार
सर्वांनी समन्वयातून काम करावे
जिल्हा प्रतिनिधि शमीम आकबानी
भंडारा, दि. 29 : संचारबंदीच्या काळात जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी किराणा दुकाने 24 तास चालु ठेवण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिल्या. औषधी दुकाने, दुध भाजीपाला, गॅस सिलेंडर अत्यावश्यक सेवा नियमित सुरु आहेत. घरीच अलगीकरण केलेले व्यक्ती बाहेर पडतांना प्रशासनाच्या निदर्शनास येत आहेत. कोरोना सदृष्य स्थिती उद्भवण्यास हे कारणीभूत आहे. त्यासाठी घरीच अलगीकरण केलेल्या व्यक्तींनी बाहेर पडू नये, तपासात दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेसंबंधी जिल्हयातील पोलीस अधिकारी, तहसिलदार, खंडविकास अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच इतर विभाग प्रमुखांची बैठक जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद मोटघरे यावेळी उपस्थित होते
कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करत असून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी घरीच थांबणे आवश्यक आहे. परदेशातून तसेच राज्यातील व राज्याबाहेरुन आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. घरीच अलगीकरण केलेल्या व्यक्तींनी बाहेर पडू नये, त्यांना दररोज एक दुरध्वनी करुन त्यांच्या आरोग्याबाबत विचारणा करावी. तपासात दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. जिल्हयातील सर्व नागरिकांनी घराबाहेर न पडता सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. भंडारा येथे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात उद्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेंतर्गत मॉकड्रिल होणार आहे.
ग्रामीण तसेच शहरी जलद सर्वेक्षण पथकाने कामास गती दयावी. या कामास नगर पंचायत व नगर परिषद मुख्याधिकारी यांनी अतिरिक्त टिम लागल्यास जिल्हा प्रशासनास अवगत करावे. तसेच या चमुंना तहसिलदार व खंडविकास अधिकारी यांनी प्रशिक्षण दयावे. जिल्हयात शहरी भागातील सर्वेक्षणाची टक्केवारी कमी आहे ती वाढवावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी सांगितले.
मोटार बाईकवर फकत एकच व्यक्तींना परवानगी देण्यात आली असून अजूनही काही व्यक्ती या नियमांचे पालन करीत नसल्याचे आढळून आल्याने दुचाकी वाहन चालान करुन गुन्हे दाखल करण्याच्या सूचना पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी दिल्या. असुविधेबाबत पोलीस अधिक्षक कार्यालयाशी संपर्क साधा, असे ते म्हणाले.
किराणा व भाजीपाला विकण्यासाठी तसेच घेण्यासाठी आलेल्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन अनिवार्य करावे. तालुकास्तरावर परदेश-परराज्य व जिल्हा असा क्रम लावण्यात आला असून तहसिलस्तरावरच त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. या कामासाठी लष्कराची सेवा सुध्दा घेण्यात येणार आहे. कोब्रा बटालियन मध्ये क्वारंटाईन सुविधा उपलब्ध आहे. तेथील क्वारंटाईन टिमसाठी 2 पोलीस नियुक्त करण्यात येणार आहे. सर्व मुख्याधिकाऱ्यांनी शहरात सोशल डिस्टंसिंगचे योग्य नियोजन करावे. अत्यावश्यक सेवा निरंतर चालु राहण्यासाठी प्रयत्न करावे. काही अडचण आल्यास कळवावे. अतिआवश्यक सेवा, टेलीफोन व बँकीगसाठी नागरिकांना पासेस देण्यात येत आहेत. तहसिलदारांसोबतच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पासेससाठी नियुक्त करण्यात आले आहे. ऑनलाईन सेवाही उपलब्ध आहे. लोकल पासेससाठी पोलीस स्टेशन व तहसिलदार यांना अधिकार दिले आहेत त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी करु नये. सेवा विस्कळीत होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
ग्रामीण भागात तहसिलदार व खंडविकास अधिकारी यांनी समन्वयातून काम करून आरोग्य अधिकारी यांचेसोबत दररोज बैठक घ्यावी. ग्रामीण भागातील होम क्वारंटाईन झालेल्या व्यक्तींना दररोज भेट देवून तसा अहवाल सादर करावा. त्यांना घराबाहेर पडू नये असा सल्ला दयावा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
देखरेखीखालील व्यक्तीने, त्यांची सुश्रूषा करणाऱ्या व्यक्तीने, निकट सहवासितांनी घरातील सुश्रूषे दरम्यान वापरलेले मास्क 5 टक्के ब्लिच सोल्युशेन किंवा 1 टक्के सोडीयम हायपोक्लोराईट द्रावणामध्ये निर्जंतुक करुन त्याची जाळून विल्हेवाट लावावी. वापरलेला मास्क हा जंतुसंसर्ग युक्त आहे असे समजावे त्याचा पुनर्वापर करू नये. खोकला, ताप, श्र्वसनाचा त्रास, धाप लागणे अशी लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाशी 07184-252247, 07184-252317, जिल्हा नियंत्रण कक्ष 07184-251222 किंवा पोलीस विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
Post A Comment:
0 comments so far,add yours