पुणे 18 मार्च : देशात आणि राज्यात कोरोनाच्या फैलावामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. अशाच सुरक्षेची खबरदारी म्हणून अनेक शहरांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. शाळा, कॉलेज, पब, डान्सबार, मोठे हॉटेल्स, बाजारपेठा अशा गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे. पण आजचा दिवस कोरोना व्हायरसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. देशात महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे तर राज्यात पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. त्यामुळे खासकरून पुण्यात आजचा दिवस धोक्याचा आहे.
आज लग्नाची दाट तिथी आहेत. अनेक लग्नसोहळ्यांचं आणि तिथीनुसार अनेक शुभ कार्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे अशा ठिकाणी एकावेळी अनेक लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. लग्न समारंभाला गर्दी टाळण्याच्या प्रशासनाने सूचना दिल्या असल्या तरी कुठलाही ठोस आदेश काढण्यात आलेला नाही. मंगल कार्यालय चालकांना 150 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येऊ न देण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे मंगल कार्यालयं चालकांमध्ये अस्वस्थता आहे.
देशात आतापर्यंत 145 प्रकरणं
आतापर्यंत देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची 145 प्रकरणं नोंदली गेली आहेत. तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी लष्करामध्येही संसर्गाची पहिली घटना समोर आली. इथे एक तरुण स्काऊट कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह आढळला. रुग्णाच्या वडिलांच्या प्रवास इतिहासावरून असं कळतं की ते इराणहून परत आले आणि त्यांना संसर्ग झालेला आढळला. या घटनेमुळे जवानाचं कुटुंब एकाकी पडलं आहे.
महाराष्ट्रात आहेत सर्वात जास्त रुग्ण
तर देशभरात महाराष्ट्रात सर्वाधिक 41 रुग्ण आढळले आहेत. मुंबई पोलिसांनी पब, डान्स बार, डिस्को आणि तत्सम सार्वजनिक ठिकाणे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यास सांगितले आहे. राज्यातील समुद्र किनारेही पोलिस रिकामी करत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर बनावट बातम्या देणाऱ्या व्यक्तीविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तथापि, बस आणि ट्रेनसारख्या अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ही अत्यावश्यक सेवा असून त्यामुळे त्यांना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. तथापि, ते म्हणाले की आम्ही लोकांना अनावश्यक भेटी टाळण्याचे आवाहन करीत आहोत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours