मुंबई : MPSC देऊन PSI होणं हे अनेक तरुणांचं स्वप्न असतं. मात्र स्पर्धा परिक्षांचा अभ्यास हा संयमाची परीक्षा पाहणारा असतो. आर्थिक परिस्थिती बेताची, वडिलांची कोरडवाहू शेती. पाऊस आला तरच शेती होणार, नाहीतर ज्वारीचा दाणाही निघत नाही अशी अवस्था, मग जोडधंदा म्हणून दूध दुभतं आणि राब राब राबणं. अशी प्रतिकूल परिस्थितीत मराठवाड्यातल्या एका तरुणाने पोलिसांत जाण्याचं स्वप्न पाहिलं आणि PSI होत ते प्रत्यक्षातही उतरवलं. अविश्रांत परिश्रम, चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर यश मिळविणाऱ्या त्या तरुणाचं नाव आहे विशाल अशोक पवार.
औरंगाबाद पासून 10 किलोमीटर असणारं बाळापूर हे त्याचं गाव. वडिलांची कोरडवाहू शेती. त्यानं कुटुंबाचा उदनिर्वाह चालवणं अवघड असल्याने विशालच्या वडिलांनी म्हशी घेऊन दुधाचा व्यवसाय सुरु केला. त्याची जबाबदारी विशालवर होती. म्हशींना चारा घालणं, दुध काढणं, त्याचं वाटप करणं असं सगळं विशाल करत असे. मात्र हे अंगमेहनतीचं काम करत असतानाही त्याची अभ्यासाची जिद्द काही कमी झाली नाही.
स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासाठी विशालने 2014मध्ये पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. नंतर सुरू झाली त्याची खरी कसोटी. दररोज 8 ते 10 तास अभ्यास आणि वाचन करणं असं सगळं सुरु होतं. त्याने तब्बल चार वेळा त्याने परीक्षा दिली. त्यात तीन वेळा तो मुख्य परीक्षेपर्यंत जाऊन आला.
पण पुढे जाता आलं नाही. अखेर 2018 मध्ये त्याला यश मिळालं. त्यानंतर शारीरिक चाचणी आणि मुलाखतही पार पडली. त्याचा निकाल नुकताच लागला आणि विशालला चांगलं यश मिळालं. महाराष्ट्रातून तो 46 वा आला आणि PSI होण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं.
Post A Comment:
0 comments so far,add yours