नागपूर: कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट ठरलेल्या शहरातील सतरंजीपुरा परिसराबाबत आता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कठोर पाऊल उचललं आहे. सतरंजीपुरा भागातील नागरिक अद्यापही माहिती लपवत असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे या परिसरातील बहुतांश नागरिकांना विलगीकरण कक्षात हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सतरंजीपुऱ्यातील 450 नागरिकांची आतापर्यंत विलगीकरण कक्षात रवानगी झाली आहे. रात्रभर ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. मंगळवारी सकाळपर्यंत विलगीकरण करण्यात येणाऱ्या नागरिकांचा आकडा अंदाजे 1200 च्या घरात पोहचेल, अशी माहिती नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
सतरंजीपुरा परिसर नागपूरसाठी कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेची चमू दररोज या परिसरात सर्व्हेक्षण करीत आहे. नागरिकांना त्यांची इत्यंभूत माहिती विचारत आहेत. परंतु अद्यापही नागरिक संपूर्ण माहिती देत नसल्याची बाब सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून समोर आली आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या नागरिकांच्या संपर्कातील सुमारे 200 च्या वर नागरिकांनीही अशीच माहिती लपवली होती. त्यांना वेळीच विलगीकरण कक्षात पाठविल्याने मोठा संसर्ग टळला. त्यातीलच पॉझिटिव्ह असलेल्यांचा आकडा 80 पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खरी माहिती लपविली तर तेथून अनेक नागरिक पॉझिटिव्ह निघू शकतात. येथील नागरिकांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितल.
आधी 100, आजच्या तारखेत 450 नागरिकांची रवानगी विलगीकरण कक्षात करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत हा आकडा 1200 च्या घरात जाईल, असेही त्यांनी सांगितले.
'त्या' एकामुळे 235 जणांना कोरोनाची भीती...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे चमू अहोरात्र प्रयत्न करत आहे. सतरंजीपुराच्या 'त्या' एका रुग्णामुळे 235 च्या वर नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
नागपुरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच एका रुग्णामुळे संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिकेच्या वतीने तेथील 30 घरांमध्ये राहणाऱ्या 150 च्या वर नागरिकांना विलगीकरण कक्षात पाठविले आहे. परंतु, लोकं याबद्दल माहिती देत नाही किंवा प्रशासनाची दिशाभूल करीत असल्यामुळे या कामात अडचण निर्माण होत आहे, अशी अडचण आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बोलून दाखवली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours