मुंबई, 28 एप्रिल : कोरोना व्हायरसशी मुकाबला करत असता राज्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्राला पत्र लिहून मदतीची मागणी केली आहे. शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या सामनातून शरद पवारांच्या मागणीचा दाखला देत राजकीय गुरूची आठवण करून दिली. तसंच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे.
'कणा मोडू नका' या शिर्षकाखाली आजच्या 'सामना'तून पुन्हा एकदा मोदी सरकारला राज्याच्या अर्थव्यस्थेवरून सेनेनं खडेबोल सुनावले आहे. 'प्रत्येक राज्याचे स्वत:चे अर्थशास्त्र आहे. ते मजबूत करणे ही जबाबदारी पंतप्रधान म्हणून मोदी यांची आहे. राज्यांना मोडकळीस आणणे म्हणजे देश मोडण्यासारखे आहे. महाराष्ट्रासारखे राज्य तर देशाचा आर्थिक कणाच आहे. हा कणा मोडू नका, पवारांनी तेच सांगितले आहे' अशी आठवण सेनेनं मोदी यांना करून दिली आहे.
काय लिहिलंय आजच्या अग्रलेखात?
'लोकच कोरोनाशी लढत आहेत, पण सरकार कोठे आहे? सरकारने काय केले पाहिजे? यावरही आता मंथन होणे गरजेचे आहे. यापुढे राज्यांना स्वावलंबी राहणे कठीण आहे आणि त्यांना केंद्राच्या मेहेरबानीवरच अवलंबून राहावे लागेल, अशी भीती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रासारखे संपन्न राज्य केंद्राच्या तिजोरीत मोठी रक्कम भरत असते. मुंबईतून साधारण सव्वा दोन लाख कोटींचा महसूल केंद्राला मिळत असतो, पण लॉक डाऊनमुळे महाराष्ट्राला मोठा फटका बसून महसुलात 1 लाख 40 हजार कोटींची तूट येईल आणि त्यामुळे राज्याचा डोलारा चालविणे कठीण होईल, असे पवार यांना वाटते. पवार यांनी पंतप्रधान मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना पत्र लिहून महाराष्ट्राच्या स्थितीबाबत स्पष्ट कल्पना दिली आहे. केंद्राने महाराष्ट्राला आर्थिक पॅकेज द्यावे, अशी पवार यांची मागणी आहे व सद्यस्थितीत ती योग्यच आहे. पवारांनी महाराष्ट्राबरोबरच इतर सर्वच राज्यांना केंद्राने मदत करावी असे सुचवले आहे.'
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours