मालेगाव, 01 मे : मालेगावमध्ये तब्बल 40 पोलिसांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हे सर्व पोलीस अधिकारी कंटेन्ट झोनमध्ये ड्यूटीवर असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मालेगाव हे महाराष्ट्रातलं चिंताजनक केंद्र म्हणून समोर येत आहे. गेल्या अधिक दिवसांपासून पोलीस विभागात कोरोनाची लागण झाल्याची अनेक प्रकरण समोर आली. त्यातील हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आकडा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 82 प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. मालेगावने पाहिलेली ही सर्वात मोठी एक दिवसाची वाढ आहे. त्यामुळे मालेगावमध्ये नागरिकांची चिंता वाढली आहे. मालेगावमधील एकूण रुग्णांची संख्या सध्या 258 आहे. त्यापैकी 40 पोलिसांची चाचणी गेल्या 48 तासांत पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
खरंतर पुणे, मुंबईसह अनेक कोरोनाच्या रेड झोनमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये काही अधिकाऱ्यांनी आपला जीवही गमावला आहे. दरम्यान, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या दिल्लीतील बटालियनमध्ये तैनात केलेल्या 47 मधील 15 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत शनिवारी माहिती समोर आली होती. त्यानंतर नव्या माहितीनुसार 46 जवानांना कोरोनाची लागण झाली असून 250 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जवळपास 400 सैनिकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यांना सीआरपीएफच्या 31 बटालियनमध्ये तैनात करण्यात आलं होतं.
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देशाची रक्षा करणाऱ्या कोरोना योद्धांच्या दलातही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours