मुंबई, 25 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत आहे. डॉक्टर, परिचारिका, आयएपीएस अधिकारी यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आता याला राज्यातील मंत्री देखील अपवाद राहिले नाहीत. काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांना या विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे. त्यानंतर आता त्यांना मराठवाड्यातील मुळगावातून पुढील उपचारासाठी मुंबईत आणण्याबाबतच्या हालचाली वाढल्या आहेत.
मुंबईत उत्तम वैद्यकीय उपचार मिळावे तसंच कोणतीही रिस्क असू नये, या मतप्रवाहामुळे संबंधित मंत्र्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणावेत असा एक विचार आहे. उत्तरी विमान सेवेस किती परवानगी मिळेल याचा विचार करता अत्याधुनिक ॲम्बुलन्सच्या माध्यमातून रस्त्याच्या मार्गाने मुंबईत आणावे का असा दुसरा पर्यायी विचार देखील सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
याबाबत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असून आज निर्णय अपेक्षित आहे. तुर्तास तरी संबंधित मंत्र्यांना या विषाणूची टेस्ट पॉझिटिव्ह जरी आढळले असली तरी लक्षणं मात्र कोणतीच नाहीत, अशी माहिती संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून कार्यालयाकडून देण्यात आले आहे.
संबंधित मंत्र्यांच्या संपर्कात आलेले मराठवाड्यातील काही आमदार तसेच अधिकारीवर्ग यांना देखील खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित मंत्री हे विधान परिषदेच्या निवडणूक कार्यक्रम दरम्यान मुंबईतील विधीमंडळामध्ये येथे सहभागी होते. त्यामुळे संबंधित खात्याचे मंत्रालयीन कर्मचारी यांनादेखील खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 सदस्यांचा शपथविधी कार्यक्रम विधिमंडळात पार पडला होता. या शपथविधी सोहळ्याला ते हजर होते. मुंबईतील दौरा आटोपून मराठवाड्यातील मुळगावी आल्यानंतर या मंत्र्यांनी स्वतः स्वतंत्र क्वारंटाइन करून घेतलं होतं. दरम्यान, या कालावधीमध्ये कोरोनाची टेस्ट करण्यात आली असता पॉझिटिव्ह आढळली आहे. पण लक्षणं मात्र कोणतेही नाहीत, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours