मुंबई, 31 मे : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन 5 ची घोषणा केली आहे. 30 जूनपर्यंत लॉकडाउन 5 लागू असणार आहे. या दरम्यान अटी आणि शर्थींसह वेगवेगळ्या क्षेत्रांना परवानगी दिली जाणार आहे. देशभरातील शाळा कधी सुरू होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. याचा निर्णय केंद्राने राज्य सरकारांवर सोडला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी राज्य व केंद्र शासित प्रदेशांना पत्र पाठवले आहे. आपआपल्या राज्यात शाळा कधी सुरू करू शकता, अशी विचारणा या पत्राद्वारे करण्यात आली आहे. सर्व राज्यांना शाळा सुरू करण्याबाबत काय उपायोजना करता येतील आणि शाळा कशा प्रकारे सुरू करता येईल, याबद्दल केंद्र सरकारला माहिती कळवायची आहे. तसंच राज्यांतर्गत वाहतुकीबद्दल राज्याने मत देण्याची विनंतीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
केंद्राने लॉकडाउन 5 ची घोषणा करत असताना शाळा, महाविद्यालय जुलै महिन्यात सुरू करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील शाळा कधी सुरू कराव्यात यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील असे सांगण्यात येत आहे.
केंद्रसरकारने पाचव्या ताळेबंद संदर्भात नवीन नियमावली जाहीर केली त्यात शाळा महाविद्यालय हे स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारने सुरू कराव्यात अथवा जुलै महिन्यात सुरू कराव्यात अशा स्वरूपाची भूमिका घेतली आहे.
राज्यात साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सर्वत्र शाळा सुरू होत असतात यंदा विषाणूंचा प्रादुर्भाव मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, धुळे अशा प्रमुख शहरात वाढत असल्यामुळे शहरी भागातील हद्दीत शाळा सुरू करणे अत्यंत कठीण परिस्थिती झाली आहे, अशी भूमिका शालेय शिक्षण विभागाची आहे. त्यामुळे तूर्तास शाळा राज्यात सुरू करू नयेत अशी भूमिका शालेय शिक्षण विभागाची असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवून आकाशवाणी आणि दूरदर्शन च्या माध्यमातून शालेय शिक्षणाचे धडे सुरू करण्याचा विचार आहे. शाळा जरी सुरू झाल्या नसल्या तरी शालेय अभ्यासक्रमास सुरुवात करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत आजच्या बैठकीत याबद्दल माहिती घेऊन तसंच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शाळा कधी सुरू कराव्यात या संदर्भात आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
राज्यात बहुतेक भागात केंद्र सरकारच्या गाईडलाईन नुसार, साधारणतः जुलै महिन्यापर्यंत किंवा जून महिन्याच्या अखेरीस शाळा सुरू होतील, असे शिक्षण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे. तूर्तास राज्यात शाळा सुरू न करता ई-लर्निंगच्या माध्यमातून शालेय अभ्यासक्रम सुरू करावा. त्यामुळे विद्यार्थ्यांनादेखील धोका राहणार नाही अशी भूमिका असल्याचे समजते.
Post A Comment:
0 comments so far,add yours