हिंगोली : कोरोनामुळं घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या अनेक लोकांचे हाल होत आहेत. अशात मुंबई, पुणे अशा महानगरात गुजराण करणारी ही लोकं 'गड्या आपला गाव बरा' म्हणत गावाकडं पोहोचत आहेत. मुंबई पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्यानं इथून आलेल्या लोकांना गावात व्यवस्थित वागणूक मिळत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. आता हिंगोलीतील वसमत तालुक्यात असाच एक प्रकार समोर आला आहे.

वसमतमधील हट्टा येथे मुंबई येथून आपल्या गावी परतलेले काही कुटुंब आपल्या स्वतःच्या शेतामध्ये क्वारंटाईन म्हणून राहत होते. यातील दोघे जण रस्त्यावर येऊन बसल्याने त्यांना रस्त्यावरून जाणाऱ्या दोन ग्रामस्थांनी 'शेतात जाऊन बसा, तुम्ही असे कसे फिरत आहेत' असे म्हणून पुढे निघून गेले होते. यावेळी त्यांना या शेतात थांबलेल्या ग्रामस्थांनी अडवून मारहाण केली. त्यामुळे त्या दोघांनी गावात येऊन ही बाब ग्रामस्थांना सांगितल्यानंतर अनेक ग्रामस्थांनी शेतात धाव घेऊन शेतात थांबलेल्या त्या कुटुंबाला मारहाण केली.

यामध्ये असलेल्या एका गरोदर महिलेला देखील मारहान केली असल्याची माहिती आहे. ही घटना काल दुपारी अडीचच्या सुमारास घडली. परजिल्ह्यात कामासाठी गेलेली अशी कुटुंब कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळं सैरभैर होऊन मोठ्या प्रमाणात आपल्या गावात परतत आहेत. हट्टा येथील अनेक कुटुंब मुंबई येथे कामानिमित्त गेली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांनी आपल्या घराकडे धाव घेतली.

आरोग्य तपासणी केली असता डॉक्टरांनी त्यांना अलगीकरण कक्षात राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हे कुटुंब गावापासून काही अंतरावर असलेल्या आपल्या शेतात गेल्या 14 दिवसांपासून राहत होते. त्यांचा काल 14 दिवसांचा कालावधी देखील पूर्ण झाला होता.

क्वारंटाईन केलेल्या एका गरोदर महिलेला मारहाण केल्याने सदर महिला रस्त्यावर पडली होती. या घटनेने हट्टा येथे एकच खळबळ उडाली होती. महिलेच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा उपसरपंचासह अन्य आठ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर या प्रकरणात सध्या परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours