मुंबई, 12 मे : विधानपरिषद निवडणुकीतील सर्व उमेदवारांची घोषणा होऊन ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र असं असलं तरीही भाजपकडून डावललं गेलेल्या एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'विधानपरिषदेच्या सहाव्या जागेसाठी मला काँग्रेसकडून ऑफर होती. मी काँग्रेसची उमेदवारी घेतली असती तर भाजपच्या 6 ते 7 आमदारांनी मला क्रॉस वोट केलं असतं. या आमदारांनी तसं माझ्याकडे मान्यही केलं होतं,' असा खळबळजनक दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.
भाजपने विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलत नवीन उमेदवारांना संधी दिली. त्यामुळे ज्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करण्यात आलं त्यांच्यामध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ खडसे यांनी तर ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी आश्वासन देऊनही दगाफटका झाला, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. याबाबत 'लोकमत'ने वृत्त दिलं आहे.
राज्य गमावलं, पण भाजपमध्ये फडणवीसांचंच वर्चस्व?
विधानपरिषद उमेदवारीसाठी भाजपने डॉक्टर अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचं तिकीट कापत भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. भाजपने ही निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये लढली होती.
त्यामुळे साहजिकच निवडणुकीतील प्रत्येक मोठ्या निर्णयाची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जबाबदारी होती. त्याचवेळी दिग्गज नेत्यांना डावलण्यात आल्याने देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्या पक्षांतर्गत विरोधकांचा पत्ता कट केल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता पुन्हा खडसे, तावडे, मुंडे आणि बावनकुळे यांना विधानपरिषद उमेदवारीपासूनही दूर ठेवल्याने पक्षात अजूनही फडणवीसांचं वर्चस्व असल्याचं बोललं जात आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours