नवी दिल्ली,12 मे :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देशातील सर्व मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत पुढची दिशा काय, हा विषय अत्यंत महत्त्वाचा होता. कोरोनाबाधितांची (Covid -19) संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता 17 मे नंतर लॉकडाऊन 4 सुरु होणार की जनजीवन पुन्हा पूर्ववत होणार, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता.
या बैठकीत पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्यातरी लॉकडाऊनशिवाय इतर कोणताही पर्याय कोरोनाला रोखण्यात असमर्थ असल्याचे सूचित केले. मात्र त्याचबरोबर लॉकडाऊन 4 कसा असेल याची दिशाही त्यांनी या बैठकीत दिली. लॉकडाऊन 3 मध्ये राज्यांत जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आणि त्यानुसार जनजीवनात सूट देण्यात आली. याचा पुढचा टप्पा आता लॉकडाऊन 4 मध्ये असणार आहे. यात संपूर्ण जिल्हा हा रेड झोन जाहीर न करता, ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे, अशी प्रतिबंधित क्षेत्रं म्हणजेच कंटेन्टमेंट झोन वगळता जिल्ह्यात इतर सर्व ठिकाणी जनजीवन सुरळीत राहण्याची शक्यता आहे, असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत दिले.
त्यामुळे रेड झोन म्हणून संपूर्ण जिल्ह्यातील व्यवहार ठप्प न होता, केवळ प्रतिबंधित क्षेत्रातील जनजीवनावरच त्याचा परिणाम होणार आहे. यामुळे देशातील सर्वच राज्यातील आर्थिक व्यवहारही बऱ्याच अंशी सुरळीत होण्याची शक्यता आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या पर्यायाला सहमती दर्शवली तर चौथ्या डॉकडाऊनच्या टप्प्यात रेड झोन जिल्हे न राहता केवळ काही भाग राहण्याची सक्यता आहे.
तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये लांब पल्ल्याच्या रेल्वेही धावण्याची शक्यता आहे, याबाबत केंद्र सरकार विचार करत असले तरी या रेल्वेचे थांबे मात्र कमी करण्यात येतील अशी शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचा आणि काळजीचा मुद्दा हा स्थलांतरित मजुरांचा आहे. सद्यस्थितीत मजुरांची मनस्थिती ही त्यांच्या त्यांच्या राज्यात परतण्याची आहे, अशा परिस्थितीत राज्य सरकारांनी सर्व त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours