भिवंडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र यामुळे यंत्रमाग कामगारांसह रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात अनेक कामगारांनी पायपिट करत आपल्या मूळगावी जाण्याचा रस्ता धरला होता. शुक्रवारी चौदा दिवसांचा लॉकडाऊन वाढल्यानंतर भिवंडीतील परप्रांतीय कामगारांसाठी भिवंडी रोड रेल्वे स्टेशन ते गोरखपूर अशा विशेष श्रमिक ट्रेनची व्यवस्था रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली. रात्री एक वाजताच्या सुमारास भिवंडीहून गोरखपूरला ही श्रमिक ट्रेन 1200 कामगारांना घेऊन  रवाना  झाली.

यासाठी पोलिसांनी प्रवाशांच्या थांबण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून चोख व्यवस्था केली होती. भोईवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मजुरांसाठी टावरे स्टेडियम , भिवंडी शहर पोलीस स्टेशन अंतर्गत मजूर मानसरोवर, निजामपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत मजूर एसटी स्टँड, तर शांती नगर पोलिस स्टेशन अंतर्गत मजुरांना भादवड येथील संपदा नाईक हॉल तर नारपोली पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या मजुरांना अंजुरफाटा येथील हरी धारा इमारत येथे तसेच कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतील मजुरांना कोनगाव पंचक्रोशी मैदान कोनगाव येथे बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

847 उत्तर भारतीयांना घेऊन नाशिकहून लखनौसाठी विशेष ट्रेन रवाना

दरम्यान मजुरांनी सर्वच ठिकाणी एकच गर्दी केल्याने 1200 सीटची ही विशेष श्रमिक ट्रेन अवघ्या काही वेळातच फुल झाली आहे. ही ट्रेन भिवंडी रेल्वे स्टेशनवरुन सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास सुटणार होती. मात्र प्रवाशांची वैद्यकीय चाचणी व ओळखपत्र तसंच पेपर तपासणीस उशीर होणार झाल्याने ही ट्रेन रात्री 12:57 मिनिटांनी गोरखपूरच्या दिशेने रवाना झाली. या

यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्यासह पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासन, मनपा आयुक्त उपस्थित होते. ही विशेष ट्रेन रवाना झाली यावेळी टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आलं तर कामगार प्रवाशांनी देखील टाळ्या वाजवत अधिकाऱ्यांचे  आभार मानले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours