मुंबई, 11 जून : 'आधी लगीन कोंढण्याचं मग रायबाचं', तानाजी मालुसरेंप्रमाणेच कोरोना योद्धांनी स्वत:ला कोरोनाविरोधी लढ्यात झोकून दिलं आहे. यासाठी कित्येकांनी आपलं लग्नही पुढे ढकललं. कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी आपलं लग्न पुढे ढकलणाऱ्या असेच कोरोना योद्धा  तब्बल दीड महिन्यांनी विवाहबद्ध  झालेत.

नाशिकचे डॉ. संदीप पुराणे आणि जळगावच्या डॉ. हेमांगी देवराज  दोघंही मुंबईतील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. 26 एप्रिलला या दोघांचंही लग्न होणार होतं. मात्र आपला नवा संसार थाटण्यापेक्षा त्यांनी ड्युटीला प्राधान्य दिलं. दोघांनीही आपलं लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

डॉ. हेमांगी देवराज यांनी सांगितलं, "कोरोनाचं संकट जेव्हा आलं तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की हा लढा इतका वेळ सुरू राहिल. आमचं लग्न 26 एप्रिलला होणार होतं. आमच्या घरच्यांनी लग्नसोहळ्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र जेव्हा लग्नाची तारीख जवळ आली तेव्हा आम्हाला लग्न आणि कर्तव्य यापैकी एक काहीतरी निवडायचं होतं. तेव्हा आम्ही दोघांनीही एकत्रितरित्या कर्तव्य निवडलं आणि लग्न नंतर करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता घरच्यांनी आणि मित्रमैत्रिणींनी मंदिरात लग्न करण्याचा सल्ला दिला आणि आम्ही मंदिरात लग्न केलं"

डॉ. हेमांगी यांचं कन्यादान केलं तेदेखील एका कोरोना योद्धानेच. त्यांचे काका ठाणे गुन्हे शाखेचे डीसीपी आहेत. जे ड्युटी पूर्ण झाल्यानंतर आपल्या पुतणीचं कन्यादान करायला पोहोचले.

डीसीपी दीपक देवराज म्हणाले, "या मुलांचा आम्हाला खूप अभिमान आहे. त्याचं हे बलिदान आम्हा सर्वांना प्रेरणा देतं की आपलं कर्तव्य सर्वात आधी असावं. परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही या दोघांचंही थाटात लग्न लावणार आहोत"

डॉ. संदीप आणि डॉ. हेमांगी यांच्या लग्नाला त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईक ऑनलाइन उपस्थित होते.

डॉ. संदीप पुराणे म्हणाले, "आई-बाबा आणि कुटुंबातील इतर सदस्य आमच्या लग्नात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकले नाही, याचं वाईट वाटतं आहे. मात्र कोरोनाशी लढा जिंकल्यानंतर आम्ही धूमधडाक्यात कुटुंब, नातेवाईक आणि मित्रपरिवारासह विवाहसोहळा आयोजित करून असा मला विश्वास आहे"

विशेष म्हणजे लग्नाआधी मेहंदी, हळद, संगीत असे बरेच कार्यक्रम होतात आणि या डॉक्टर जोडप्यासाठी रुग्णालयाच्या हॉस्टेलमध्येच या सर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्यांच्या डॉक्टर सहकाऱ्यांनी त्यांना लग्नाआधीच एक सरप्राइज गिफ्ट दिलं.

डॉ. संदीप आणि डॉ. हेमांगी यांच्या सहकारी डॉक्टरांनी सांगितलं, "आम्ही लग्नाच्या आदल्या रात्री या दोघांनाही सरप्राइज दिलं. आता दोघंही ड्युटीवर आहेत. मात्र अजून पुढे त्यांच्यासाठी खूप सरप्राइज आहेत. या दोघांनीही त्यांच्या लग्नसोहळ्यात काही कमी राहिल्याचं वाटू नये, त्यांच्या कुटुंबाची कमी जाणवू नये, याचा पूर्ण प्रयत्न आम्ही करत आहोत"

बरं लग्न आटोपल्यानंतरही हे कोरोना योद्धा दाम्पत्य आपल्या सुखी संसाराची स्वप्नं रंगवत न बसता पुन्हा रुग्णालयात कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झालं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours