मुंबई, 11 जून : मुंबई-ठाण्यासह उपनगर आणि पालघरमध्ये 13 आणि 14 जून रोजी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. खरं तर राज्यात मान्सून 11 जूनपर्यंत धडकेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मात्र अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यानंतर आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर गेला आहे. केरळमध्ये जरी मान्सून वेळेत दाखल झाला असला तरी महाराष्ट्रात मात्र येण्यात विलंब झाला आहे.
मागच्या वर्षी मान्सून जवळपास 2 आठवडे उशिरा म्हणजे 25 जूनपर्यंत आला होता. कोकण किनारपट्टीत सर्वप्रथम मान्सूनचं आगमन होईल. गेले दोन दिवस तळकोकणात आणि गोव्यात हलक्या सरी कोसळत आहेत. दक्षिणेच्या किनारपट्टी भागात मान्सून बुधवारी दाखल होणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.
दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात मान्सून दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर मुंबई- ठाण्यासह उपनगर आणि पालघरमध्ये 13 आणि 14 जून रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पहिल्यात टप्प्यात पावसाचा जोर राहाणार आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनची वाटचाल मंदावली होती. ती पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. केरळमध्ये वेळेवर पोहोचलेला मान्सून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या चक्रीवादळामुळे कर्नाटकमध्येच अडला होता. आता मान्सूनच्या आगमनासाठी पूरक वातावरण निर्माण झाल्यानं मान्सून येत्या 48-72 तासांत दाखल होईल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours