बेला येथील घटना
विलास केजरकर,
जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा :- भरधाव वेगाने जाणा-या ट्रकने बसला कट मारल्याने बस रस्त्यावरून खाली उतरली तर ट्रकची पलटी झाली आहे. सदर अपघात राष्ट्रीय महामार्गावर भंडारा जवळील बेला येथे आज ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडला. या घटनेत ट्रक चालकासह बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत.
भंडारा बसस्थानकावरून येथून नागपूरच्या दिशेने बस क्रमांक एमएच ४० / वाय ५१४५ ही सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पुर्ण क्षमतेने प्रवासी भरून निघाली होती. दरम्यान बस शहराबाहेर पडताच बेला येथील इंडियन रेस्टारेन्ट समोर असतांना नागपूर कडून भंडाराच्या दिशेने भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक डब्ल्यू बी २९ / बी ६४१३ ने दुस-या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात होता. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग एकेरी असल्याने ट्रक चालकाने वेगाने ट्रक वळविण्याचा प्रयत्न केल्याने त्याचे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्यावर पलटला तर एसटी बस रस्त्याच्या खाली उतरली. यावेळी बस चालकाने प्रसंगावर मात करून मोठ्या हिंमतीने बसवर नियंत्रण कायम ठेवले, म्हणून मोठा अपघात टळला. मात्र बस रस्त्याच्या खाली उतरल्याने काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
यावेळी परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमी ट्रकचालक व प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालय व खाजगी रुग्णालयात दाखल केले.
प्रसंगी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या.
अपघाताची माहिती भंडारा पोलिसांना मिळताच वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. व दुरवर लागलेल्या वाहनांंच्या रांगांसाठी मार्ग मोकळा केला. आणि वाहतूक सुरळीत केला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours