20 एप्रिल : औरंगाबादच्या कचरा प्रकरणी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद वासीयांची जाहीर माफी मागितली आहे. कचरा प्रश्न म्हणावा तस सुटत नाहीये, अतिशय कुर्मगतीने काम सुरु आहे, ही जबाबदारी जरी सगळ्यांची असली तरी नागरिकांना त्रास होतोय, त्यामुळे मी त्यांची क्षमा मागतो असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
पुढच्या 10 दिवसांत मी प्रशासन, पदाधिकारी यांना मार्ग काढायला सांगितलं आहे आणि मार्ग निघेल असा मला विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलय. मी पुन्हा पुन्हा क्षमा मागून प्रश्न सोडवण्याची ग्वाही देत असल्याचंही उद्धव म्हणाले आहेत.
दरम्यान, काम करणारे अधिकारीही बदल्यात आले मग निर्णय कोण घेणार असा सवालही त्यांनी या बैठकीत उपस्थित केला. त्याचबरोबर यावर राजकारण करण्याची इच्छा नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
औरंगाबादेत प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत निवडणूकाच्या दृष्टीने संघटनात्मक बाबींवर चर्चा केल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. यापुढे या भेटीचा कार्यक्रम महाराष्ट्रात सगळीकडे होणार, शिवसेनेच्या उज्वल भवितव्यासाठी हे पाऊल असल्याचंही उद्धव म्हणाले.
देशात निवडणूका डिसेंबरमध्ये होणार असं कळतंय, समजतय, म्हणून माझ्या पक्षात मी चर्चा करतोय, युती होणार नाही हे आम्ही आधीच सांगितलं असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
विदर्भातील लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या जमिनी अनिर्बंध करून शेतकऱ्यांना लाभ दिला, ही आनंदाची बाब आहे, याबाबत मी सरकारचे अभिनंदन करतो, मात्र अशी योजना फक्त विदर्भापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यात राबवावी अशी मागणी मी करत असल्याचं उद्धव म्हणाले.
पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याऐवजी, मुंबईतच घ्यावे, हव तर विदर्भासाठीचे निर्णय मुंबईतच घ्या असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याची गरज ती काय? असा प्रश्न त्यांनी या बैठकीत उपस्थित केला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours