मुंबई, 11 जून : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्राबाबत शंका उपस्थित करणारे माननीय शरद पवार यांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचा पलटवार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. धमकीपत्र म्हणजे कांगावा असल्याचा आरोप काल पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही पलटवार केला आहे.
पंतप्रधान हे पक्षाचे नाही, तर देशाचे नेते असतात. पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही ! असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत, सत्य काय आहे हे बाहेर येईलच त्यामुळे शरद पवारांचं धमकी पत्राबाबातचं वक्तव्य दुर्दैवी आहे असा पलटवार मुख्यमंत्र्यांनी पवारांवर केला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पवारांना प्रतिउत्तर दिलं आहे.
दरम्यान, काल पार पडलेल्या पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सत्ताधारी भाजपवर घणाघाती हल्ला केला होता. देशातील मोदी सरकार सत्तेचा गैरवापर करतंय असा आरोप करत कोरेगाव भीमा प्रकरणाशी संबंध नसलेल्यांना अटक केल्याची टीका पवारांनी केलीय.
तसेच मोदी आणि फडणवीसांना आलेली धमकीची पत्रं म्हणजे निव्वळ कांगावा असल्याचंही पवार म्हणाले आहेत. दरम्यान पालघरमधील भाजपचा विजय हा खोटा आहे. या ठिकाणी जर राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आली तर भाजपचा नक्कीच पराभव होईल असं म्हणत पवारांनी शिवसेनेला तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याचं आवाहन केलं. ईव्हीएम विरोधात सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन विरोध करण्याची गरज असल्याचंही पवारांनी बोलून दाखवलंय.
सत्तेचा मस्तवालपणा राष्ट्रवादीने कधीच दाखवला नाही, असे सांगत भाजपाचे पालघरचे यश हे खरे नव्हे. नोटाबंदीने सामान्य नागरिक, आया-बहिणी भिकेला लागल्या आहेत. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. रोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी अजूनही झालेली नाही, अशी टीका करत पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
विशेष म्हणजे त्यांनी यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पुणेरी पगडीऐवजी महात्मा फुलेंच्या पगडीचा वापर करण्याची सूचना करत छगन भुजबळ यांना फुलेंची पगडी घातली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला भुजबळ यांचा पुणेरी पगडी घालून सत्कारही करण्यात आला होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours