मुख्य सपादीकी. सुनिता परदेशी
मुख्यमंत्री वचपा काढत असल्याचा देवानंद पवार यांचा आरोप

यवतमाळ : केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून शेतक-यांवर होणारे अन्याय पाहवत नाही. या सरकारचा प्रत्येक निर्णय शेतकरीविरोधी आहे. त्यामुळे त्या विरोधात लढा देणे हे माझे कर्तव्य आहे. शेतक-यांसाठी रस्त्यावर उतरल्याने तडीपारीची नोटीसच काय बंदुकीच्या गोळ्या झाडल्या तरी आनंदाने त्याचा स्विकार करेल. मात्र दबावात येऊन शेतक-यांच्या न्याय हक्काचा लढा सोडणार नाही असे प्रतिपादन शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले. 
शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी विरोधी निर्णयाचा विरोध केला, आंदोलने केली. त्यामुळे भाजप सरकारने पोलीसांच्या माध्यमातून गुंड, दरोडेखोर, मवाली ठरविण्याचा कुटील डाव रचला आहे असा आरोप पवार यांनी केला. शेतक-यांना खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारला शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यात सपशेल अपयश आले आहे. सद्यस्थितीत शेतकरी अनेक संकटांच्या गर्तेतून जात आहेत. कर्जमाफीमध्ये फसगत झाली आहे. गुलाबी बोंड अळीची मदत अधिवेशनात बोलल्याप्रमाणे दिली नाही. दुष्काळी मदतही मिळाली नाही. 
शेतक-यांच्या बाबतीत सर्वच आघाड्यांवर भाजपाचे केंद्र व राज्य सरकार पेâल ठरले आहे. त्यामुळे शेतक-यांच्या मनात सरकार विरोधात विद्रोहाची भावना निर्माण झाली आहे. त्या विद्रोहाला व्यासपीठ देणा-या आंदोलकांना दडपण्याचा प्रयत्न पोलीस विभागाच्या गैरवापर करून नेहमीच मुख्यमंत्री राज्यभर करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री असल्याने राज्याची कायदा सुव्यवस्था राखण्याचे कामही त्यांचेच आहे. राज्यातील गुन्हेगार शोधुन त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम करण्याऐवजी शेतकरी आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न गृहविभाग करत आहे. 
यवतमाळचे जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार हे देखिल जिल्ह्यातील गुन्हेगारीवर लगाम लावण्याऐवजी शेतकरी आंदोलकांवर चुकीची कारवाई करीत आहेत असा आरोप देवानंद पवार यांनी केला. हद्दपारीच्या नोटीसमध्ये ज्या गुन्ह्यांची माहिती नमुद केली आहे त्यापैकी बहुतांश गुन्हे शेतकरी आंदोलनातील आहेत व इतर गुन्हे राजकीय असून त्यावर मा.उच्च न्यायालयाने स्थगनादेश दिले आहेत. शिवाय या नोटीस मध्ये असलेला कथित फसवणुकीचा गुन्हा २०१४ मधील आहे. तो अजुनही तपासातच आहे. वास्तविक गुन्हा दाखल केल्यावर ९० दिवसांच्या आत पोलीसांनी आरोपपत्र दाखल करायला पाहिजे. उल्लेखनिय म्हणजे याच गुन्ह्यात पोलीसांनी 'बी.फायनल' पाठविला आहे. १४ जुलै २०१७ रोजी प्रतिकात्मक शवयात्रा आंदोलन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला अशा गुन्ह्याचाही आरोप आहे. वास्तविक त्याचदिवशी रोजी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात या आंदोलनादरम्यान कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अथवा वाहतुकीस अडथळा निर्माण झाला नाही असे म्हटले आहे. त्यामुळे नोटीस मध्ये केलेला उल्लेख बरोबर आहे की, पोलीस अधिक्षकांच्या प्रसिद्धी पत्रकातील उल्लेख बरोबर आहे? असा प्रश्न पवार यांनी केला. भारतीय पोलीस सेवेतील अधिका-याने राजकीय हस्तकासारखे काम करणे दुर्दैवी व धोकादायक आहे असेही ते म्हणाले. 
लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी पोलीसांची आहे. मात्र तेच पोलीस राजकीय दबावातून लोकशाहीचा गळा घोटत आहे असा आरोप पवार यांनी केला. शेतक-यांच्या रोषामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकदा दौरा रद्द करावा लागला व काहीवेळा लपुनछपुन जिल्ह्यात यावे लागले त्यामुळे त्याचाच वचपा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलीसांवर दबाव टाकुन हद्दपारीची नोटीस द्यायला लावली असा थेट आरोप देवानंद पवार यांनी केला. 
मी कोणाचाही खुन केला नाही, धोकादायक अस्त्र शस्त्र बाळगले नाही, बलात्कार केला नाही शिवाय यापुर्वी न्यायालयात माझ्याविरूद्ध कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही. माझ्या अस्तित्वाने व्हिआयपींना धोका होऊ शकतो असे माझ्याकडून काही घडले नाही. आजवर जिल्ह्यात जेवढे मंत्री येऊन गेले त्यांच्या कार्यक्रमात कोणताही गोंधळ केला नाही. असे असतांना पोलीसांची हि कार्यवाही म्हणजे अकलेची दिवाळखोरीच आहे. शेतकरी आंदोलकाविरूद्ध हद्दपारीची कार्यवाही करणे हा एकप्रकारे शेतक-यांचाही अवमान आहे असे पवार म्हणाले. 
शेतक-यांच्या हक्कासाठी लढतांना छातीवर गोळ्याही झेलायला मागेपुढे पाहणार नाही. गुन्ह्यांमध्ये न्यायायालयाचा स्थगनादेश असतांना ते गुन्हे प्रमाण मानुन हद्दपारीची नोटीस बजावून पोलीसांनी अकलेचे तारे तोडले आहे. पोलीसांनी न्यायालयाचाही अवमान केला आहे. त्याबद्दल त्यांचे विरूद्ध अवमान याचिका दाखल करण्यात येईल. तसेच हद्दपारीची नोटीस देऊन सामाजिक प्रतिष्ठा व जनमानसात असलेला आदरभाव संपवून त्यांच्या मनात संशय निर्माण केल्यामुळे पोलीस विभाग व ज्यांच्या स्वाक्षरीने हि नोटीस काढण्यात आली ते उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांचे विरूद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची माहितीही पवार यांनी दिली. या पत्रकार परिषदेला अशोक भुतडा, शैलेश इंगोले, मिलिंद धुर्वे, यशवंत इंगोले, हेमंतकुमार कांबळे, गुणवंत सुर्यवंशी, सैय्यद शोएब, वासूदेव राठोड, रणजीत जाधव उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours