मुंबई: भीमा कोरेगाव प्रकरणी पुणे पोलिसांनी आज देशातल्या अनेक शहरांमध्ये माओवादी समर्थकांवर छापे घातले. या छाप्यातून भीमा कोरेगाव प्रकरणातला त्यांचा संबंध स्पष्ट झाला असला तरी इतर अनेक प्रकरणांमध्येही खळबळजनक माहिती आणि धागेदोरे पोलिसांना मिळाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पोलीस लवकरच याबाबत खुलासा करणार आहेत. भीमा कोरेगाव प्रकरणी दंगलीचं माओवादी कनेक्शन शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी आज मुंबई, ठाणे आणि हैदराबादमध्ये ठिकठिकाणी छापे घालून माओवादी विचारवंतांना अटक केलीय. यात विद्रोही कवी वरवर राव, अरुण परेरा, गौतम नावलाखा, वर्णन गोंसलविस आणि सुधा भारद्वाज यांचा समावेश होता. यांच्या चौकशीतून पोलीसांना अनेक धागेदोरे मिळाले असून जे साहित्य जप्त करण्यात आलं त्यातूनही अनेक आक्षेपार्ह गोष्टी मिळाल्या आहेत. भीमा कोरेगावशिवाय इतर कुठल्या गोष्टींमध्ये त्यांचा समावेश आढळल्याने पोलीसांची चिंता वाढली आहे.
माओवादी समर्थक विचारवंत आणि विद्रोही कवी वरवर राव यांना पुणे पोलीसांनी अटक केलीय. पोलिसांच्या एका विशेष पथकाने राव यांच्या हैदराबादमधल्या घरी छापा टाकून ताब्यात घेतलं. राव यांना नामपल्लीच्या न्यायालयात हजर केल्यानंतर पुण्याला आणण्यात येणार आहे. या कारवाईनंतर मानवी हक्क समर्थकांनी राव यांच्या घरासमोर येऊन कारवाईला विरोध केला. राव हे माओवादी समर्थक विचारवंत समजले जातात. आंध्रप्रदेशात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. या आधीही त्यांच्यावर माओवादी समर्थक असल्याचे अनेकदा आरोप झाले होते आणि प्रचंड टीकाही झाली होती.
अनेक प्रकरणात त्यांनी माओवादी आणि सरकार दरम्यान मध्यस्तीही केली होती. दरम्यान, एल्गार परिषदेच्या आयोजनातील माओवाद्यांच्या सहभागाच्या संशयावरून हे छापे टाकण्यात आले यावरुन पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. हैदराबाद, मुंबई, दिल्ली, हरियाणा, रांची या शहरांमध्ये हे छापासत्रं सुरू आहेय.
काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण? 
भीमा-कोरेगावमध्ये 1 जानेवारीला किरकोळ वादातून दोन गटांमध्ये मोठा वाद झाला होता. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली होती. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे रुपांतर दगडफेक आणि जाळपोळीत झालं.
भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये हा वाद उफाळला होता.
सणसवाडीत हा वाद शिगेला पोहचला होता. तिथे अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांसह अनेक जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours