मुंबई- वाहतुकीसाठी धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेला लोअर परेलचा डिलाइल पुलाच्या पाडकामाची निविदा प्रक्रिया आज पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुलाच्या पाडकामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती येत्या दिवसांमध्ये करण्यात येणार आहे. कंत्राटदाराची नियुक्ती झाल्यानंतर पाडकामाच्या प्रक्रियेला तातडीने सुरूवात होणार आहे. हा पूल प्रवाशांसाठी असुरक्षित असल्याने पूल पाडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पुलाच्या पाडकामासाठी साधारणपणे पाच ते सहा कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे.
या कामासाठी रेल्वे प्रशासन महापालिका निधीची वाट पाहणार नसून कामाला तातडीने सुरूवात करणार आहेत. २४ जुलैला सकाळी ६ वाजल्यापासून लोअर परळचा पूल प्रवाशांसाठी बंद करण्यात आला होता. हा पूल वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला असून पादचारी प्रवाशांसाठी अंशतः बंद ठेवण्यात आला आहे. अंधेरी पूल दुर्घटनेनंतर माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी मुंबई उपनगरीय पुलांची माहिती मागविली होती. माहिती अधिकारानुसार, मुंबई उपनगरातील ४४ रेल्वेवरील पुलांना ६० वर्षे पूर्ण झाली असून, अद्यापही ते वापरात आहेत. यात १८ आरओबी (आरओबी) २६ पादचारी (एफओबी) तर, १५ आरओबीची आणि ४ पादचारी पुलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours