पुणे : अमिर खान यांच्या पानी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेचा निकाल आज जाहीर झाला. त्याचा पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात पार पडला या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण अशा सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. या नेत्यांच्या चौफेर टोलेबाजीने हा कार्यक्रम चांगलाच रंगला. वॉटरकप स्पर्धेत पहिला क्रमांक सातारा जिल्ह्यातल्या टाकेवाडी (आंधळी) या गावेने मिळवला तर दुसरा क्रमांक सातारा जिल्ह्यातल्या भांडवली आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या मोताळा गावाने तर तिसरा क्रमांक बिड जिल्ह्यातल्या आनंदवाडी आणि नागपूर जिल्ह्यातल्या उमठा या गावाने पटकावला.
कोण काय म्हणालं?
राज ठाकरे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणेच फटकेबाजी केली. 1960 ला संयुक्त महाराष्ट्र झाला. इथं दोन्ही पक्षांचे नेते आहेत. जर गेल्या 60 वर्षात सिंचनाचा पैसा मुरला नसता तर राज्याची पाणी पातळी कमी झाली नसती. यावेळी लोकांनी राज ठाकरे यांनी श्रमदानाला यावं अशी मागणी केली. त्यावरही त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. मी श्रमदानाला नक्की येईल. मला कुदळ कशी मारायची ते माहित आहे. मात्र फावडं कसं मारायचं ते शिकवाल असं राज यांनी म्हणताच लोकांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिला.
अजित पवार : अजित पवारांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. आपल्याकडे काही जण बोलघेवडे असतात. त्यांना काहीच करायचं नसतं. ते येतात आणि बोलून निघून जातात. आपल्याकडे एक म्हण आहे, गाव करेल ते राव करेल काय करेल, पण आता ती म्हण बदलली आता मी म्हणतो जे किरण राव करेल तेच आता गाव करेल. आमिर खानने कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर जाऊ नये. कोणताही शिक्का मारू नये असं केलं तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : राज ठाकरे यांना प्रश्न पडला इतकी वर्षे जल संधारणाचं काम का झालं नाही कारण पाणी अडवा पाणी जिरवा या ऐवजी माणसं आडवा आणि त्यांची जिरवा हेच आत्तापर्यंत झालं. हे समजलं असतं तर प्रश्न पडला नसता. आमीर खान यांनी पाण्याची लोकचळवळ उभी केली. सामान्य माणसांना जागृत केलं. त्यांच काम खूप प्रेरणादायी आहे. येत्या 2,3 वर्षात महाराष्ट्र पाणीदार होईल ,दुष्काळ मुक्त होईल. अनिर्बंध उपसा थांबवला नाही तर पुन्हा दुष्काळात जाऊ म्हणून म्हणून पीक घ्यायचं ते ठरवावं लागेल. पुढचं वर्ष निवडणुकीचं वर्ष असल्याने अमिर खान यांना वॉटर कप घ्यायचा की नाही अशी चिंता आहे. मात्र महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे. पाणी प्रश्नी सगळे एक आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours