नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : थोड्याच वेळापूर्वी देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं पार्थिव भाजप कार्यलयाच्या दिशेने निघालाय. यांच्यावर आज दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. राजधानी दिल्लीतील राजघाटावरील स्मृतीस्थळावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. काही वेळ त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या दिल्लीतील 6-A कृष्ण मेनन मार्गवरील निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, तिथे अंत्यदर्शनासाठी राजकीय नेत्यांची रीघ लागली होती. त्यानंतर सकाळी 10च्या सुमारास त्यांचं पार्थिव आता भाजपाच्या मुख्यालयाच्या दिशेने निघालं आहे. तिथे  त्यांचं पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता यमुना नदीच्या किनारी राजघाटाजवळ राष्ट्रीय स्मृती स्थळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राज्यातले सर्व प्रमुख नेते वाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी दिल्लीत जमा झालेत.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं गुरूवारी सायंकाळी दिल्लीतल्या 'एम्स' हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. अटलजींच्या निधनाने देशभर दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या 9 आठवड्यांपासून त्यांच्यावर 'एम्स'मध्ये उपचार सुरू होते. चार दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खाल्यावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. वाढतं वय आणि दिर्घ आजारामुळे उपचारांनाही प्रतिसाद देणं त्यांनी बंद केलं होतं. शेवटपर्यंत डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली मात्र अटलजींची आजाराशी असलेली झुंज अखेर संपली.
94 वर्षांचे वाजपेयी हे गेल्या काही वर्षांपासून डिमेंशियाने आजारी होते. प्रकृती अस्वस्थतेमुळं वाजपेयी यांनी सार्वजनिक जिवनातून निवृत्तीही घेतली होती. भाजपचे संस्थापक सदस्य असलेल्या वाजपेयींनी तीन वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवलं होतं. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते बिगर काँग्रेस पक्षाचे पहिलेच नेते होते.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours