मुंबई, 06 आॅगस्ट :  मराठा आरक्षणाबाबत वैधानिक कारवाई नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करणार, सर्वांचे हित जपूनच मेगाभरती करणार अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच लोकशाहीने अनेक मार्ग आंदोलनासाठी दिले आहेत. त्यात हिंसेला स्थान नाही. हिंसेमुळे आंदोलन, विचार, संघर्ष बदनाम होतो. कोवळी तरूणाई आत्महत्या करते, यामुळे मनाला अतिशय वेदना होतात त्यामुळे आत्महत्या करू नका चर्चेला या मी तुमच्यासाठी एक पाऊल मागे घ्यायला तयार आहे असं आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं.
गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्र ढवळून निघालाय. आरक्षणासाठी एकापाठोपाठ तरुणांनी आत्महत्या केल्या त्यामुळे मराठा आंदोलन चिघळले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय सह्याद्री वाहिनीवरुन थेट जनतेशी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी सरकारने किती प्रयत्न केले याचा पाढाच मुख्यमंत्र्यांनी वाचला.
मराठा आरक्षणासाठी सरकार देण्यासाठी तयार आहे मात्र सुप्रीम कोर्टात न्यायिक बाजू टिकवून ठेवण्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न सुरू आहे. राज्य मागास आयोगाला मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल लवकरात लवकर देण्याची मागणी केली आहे. हा अहवाल आल्यानंतर तातडीने विशेष अधिवेशन बोलावले जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
तसंच मराठा आरक्षणाबाबत वैधानिक कारवाई नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणार आहे. ज्यामुळे कोर्टात सरकाराला बाजू लावून धरता येईल अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.
तसंच संवेदनशील नेत्यांनी नेतृत्त्व करणे सोडले तर संपूर्ण समाज दिशाहिन होईल. मार्ग संवादातून निघणे शक्य. सरकार संवादासाठी सदैव तयार, कटिबद्ध आहे. हा प्रश्न राजकारणात अडकविण्याचा नाही, प्रतिस्पर्धेसाठी वापरण्याचा नाही. असे झाले तर महाराष्ट्र आपल्याला कधीही माफ करणार नाही. आता राजकीय कुरघोडी करण्याऐवजी या व्यवस्थेचे एक घटक म्हणून एकत्रित येऊन या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. हे आवाहन गांभीर्याने घेऊन, संवादाची प्रक्रिया पुढे नेली पाहिजे असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांना केलं.
तसंच रयतेच्या स्वाभिमानाची, मालमत्तेच्या रक्षणाची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती. छत्रपतींच्याच विचारांवर राज्य चालविण्याची आपली परंपरा आहे आता संघर्ष पुरे झाला. आपण सारे एकत्र येऊन शिवछत्रपतींचा महाराष्ट्र एकसंध ठेऊ या. या पुरोगामी महाराष्ट्राला सर्व मिळून पुढे नेऊ असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
मराठा आरक्षण द्या अन्यथा अनर्थ अटळ, उदयनराजेंचा इशारा
दरम्यान,मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्या, मराठा आरक्षणाकडे मागील सरकारने आणि या सरकारनेही दुर्लक्ष केलंय. पण आता काहीतरी मार्ग काढा नाहीतर अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. लोक ऐकण्याच्या मनस्थितीत राहिली नाहीत, अजूनही जर तुम्हाला अंत बघायचा असेल तर बघा काही घडलं तर मग याला न्यायव्यवस्था, प्रशासन आणि राज्यकर्ते जबाबदार असतील अशा इशारा साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलाय. तसंच राज्य सरकारने मराठा तरुण हा माओवादी होण्याची वाटू पाहु नये असाही इशारा दिला.
मराठा आंदोलनात परप्रांतीयांकडून हिंसाचार,राज ठाकरेंचा आरोप
सरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलन पेटले. मराठा आंदोलनात ७५०० मराठी मुलांवर ३०७ चे गुन्हे दाखल झाले आहे. एका बाजूनं पेटवायचं दुसऱ्या बाजूनं गुन्हे टाकून त्यांचे आयुष्य बरबाद करायचं आता अशा मुलांना नोकऱ्या मिळू शकत नाही. मराठा आंदोलनात बाहेरची मुलं येऊन इथं हिंसा करतायत. ज्यांचा महाराष्ट्राशी संबंध नाही ते हिंसा करतायत असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours