नवी दिल्ली: राफेल या लढाऊ विमानांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोप करून काँग्रेस भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतेय. तर भाजपनेही काँग्रेवर पलटवार केला आहे. राहुल गांधी यांना कुठल्याच गोष्टीचं गांभार्य नाही. गळा भेट घ्यायची, कुणाला डोळे मारायचे हे राहुल गांधींचे उद्योग आहेत. सार्वजनिक चर्चा म्हणजे काही लाफ्टर चॅलेंज नाही अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी राहुल गांधींवर केली आहे. लोकशाहीमध्ये टीका आणि आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात पण पण ते करताना शब्दांमध्ये बुद्धीचातुर्य दिसायला पाहिजे असंही जेटली यांनी म्हटलं आहे.

फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद यांनी राफेलसाठी भारतानं एका विशिष्ट कंपनीची शिफारस केली होती असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवली होती. नंतर ओलांद यांनी आपलं वक्तव्य फिरवत आपल्याला काही माहित नाही असं स्पष्ट केलं होतं.

जेटली म्हणाले हे सर्व सुनियोजित असण्याची शक्यता आहे. कारण 30 ऑगस्टला राहुल गांधी यांनी काही ट्विट करून फ्रान्समध्ये स्फोट असल्याचं म्हटलं होतं. फ्रान्समध्ये काही खुलासे होणार आहेत हे राहुल गांधीं यांना कसं काय माहित झालं? असा सवाल जेटली यांनी केलाय.

राफेल विमानं खरेदी करण्याचा करार हा पूर्ण पारदर्शक असून अशा लढाऊ विमानांची भारतात गरज आहे. यात भ्रष्टाचार झाला नसल्याने कुठल्याही परिस्थितीत राफेल विमान खरेदी करण्याचा करार रद्द करण्यात येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours