बारामती : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या भाषणाच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. ते नेहमीच कार्यकर्त्यांना कानपिचक्या देत असतात. रविवारी बारामतीत राष्ट्रवादीच्या वतीनं आयोजित कार्यकरत्यांच्या कार्यक्रमात दादांनी आपल्या खास शैलीत कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. एका गावातील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनावरून बोलताना अजित पवारांनी महिलांना आरक्षण मिळतंय म्हणून लिंग बदल शस्त्रक्रिया कराल का असा सवाल उपस्थित केला.. त्यावरून सभागृहात एकच हशा पिकला.
बारामतीतल्या शरद सभागृहात राष्ट्रवादीच्या मतदान केंद्र स्तरावरच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात अजित पवारांनी कार्यकर्त्याना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. यावेळी एका महिला जिल्हा परिषद सदस्याच्या पतीला उद्देशून बोलताना अजित पवारांनी आपल्या खास शैलीत आरक्षण मिळतंय म्हणून लिंग बदल शस्त्रक्रिया कराल का असा सवाल उपस्थित केला. अलीकडे आपण अशा बातम्या पाहतोय, त्यामुळं कोणीही काहीही करेल असं म्हणताच सभागृहात हशा पिकला.
कार्यकर्त्यांनी आपल्या मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांचं हसून स्वागत करावं असा सल्ला देतानाच आपणही हसण्याचा प्रयत्न करतो, मात्र पंचाईत होते अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टोलेबाजी केली. आपण हसतच बसलो, तर लोक याला वेड लागलंय का अशी शंका उपस्थित करतील असंही ते म्हणाले. त्याचवेळी कार्यकर्त्यांनी बोगस मतदान करण्याला आळा घालावा असं सांगताना आपल्यावर कोणी बोट ठेवू नये यासाठी दक्षता घेण्याची तंबीही अजित पवारांनी दिली.
आपण मतदान प्रतिनिधी म्हणून काम करताना कोणत्याही पक्षाकडून बोगस मतदान होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. ज्यावेळी आपण इतरांवर बोट ठेवतो तेव्हा आपणही स्वच्छच असलं पाहिजे असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
Post A Comment:
0 comments so far,add yours