मुंबई: अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमादरम्यान एक बोट बुडाल्याची घटना घडलीये. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झालाय. सिद्धेश पवार असं मृत तरुणाचे नाव आहे.त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती मरिन लाईन पोलिसांनी दिलीये.
मरिन ड्राईव्ह किनाऱ्यापासून समुद्रातील काही अंतरावर असलेल्या खडकावर शिवस्मारक उभारण्यात येणार आहे. आज या स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आज दुपारी चार वाजेच्या सुमारास गेट वे आॅफ इंडियाहून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्यासह इतर मान्यवर आणि ४० पत्रकार २ स्पीड बोटीतून रवाना झाले होते. मात्र, समुद्रात असलेल्या खडकाचा अंदाज न आल्यामुळे एक बोट धडकली.
सुमारे 40 पत्रकारांना घेऊन निघालेली बोट गेले दोन तास समुद्रात भरकटत होती. यामध्ये अनेक मोठे अधिकारी होते. सुमारे २५ मिनिटं ही अपघातग्रस्त बोट २५ पत्रकारांना घेऊन समुद्रात होती. तोपर्यंत दुसरी बोट तिथे पोहोचली आणि २४ जणांना सुखरूप बाहेर काढलं. मात्र, ही बोट पाण्यात बुडाली. यावेळी सिद्धेश पवार हा बोटीतील केबिनमध्ये अडकला गेला. त्यामुळे बोटीसोबत समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाला.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार ही बोट टो करून किनाऱ्यावर आणण्यात आली आहे. दरम्यान आज शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम होणार होता. तो रद्द करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात इंजिन नादुरुस्त होऊन बोट बुडत असताना त्या बोटीतून प्रवास करणाऱ्यांना वाचविण्यात पोलिसांना यश आलं. दुसरी बोट लगेच घटनास्थळी पाठवून पोलिसांनी बुडणाऱ्या बोटीतील प्रवाशांची सुटका केली.
दरम्यान, गेट वे आॅफ इंडिया आणि मरिन ड्राईव्ह समुद्रातील परिसरात खडक पसरलेला आहे. शिवस्मारकासाठी निवडलेली जागा ही योग्य नाही. निवडणुकीच्या तोंडावर शिवस्मारक उभारण्याचं विनायक मेटे यांनी नौटंकी सुरू आहे, संतप्त प्रतिक्रिया दामोदर तांडेल यांनी दिली. ज्या मार्गानं आज ही बोट खडकापर्यंत नेण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या मार्गाची माहिती बोटचालकाला नव्हती. आम्हालाही त्यांनी याविषयी विचारलं नाही.
तर बोटीला खडकाला धडक बसल्यामुळे बोटीचा खालचा भाग कापला गेला. त्यामुळे बोटीमध्ये पाणी शिरले आणि बोट बुडाली. पाणी भरल्यामुळे बोटेतील पत्रकारांनी आम्हाला फोन करून सांगितलं. त्यामुळे दुसरी बोट वेळेवर पोहोचली आणि सर्वांना बाहेर काढलं अशी माहिती शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी दिली. तसंच मी आतापर्यंत शिवस्मारकाच्या ठिकाणी २० वेळा जाऊन आलोय, त्यामुळे तो मार्ग ठरलेला आहे. यावेळी बोटचालकाला याचा अंदाज आला नाही त्यामुळे बोट बुडाली असावी असंही मेटे यांनी सांगितलं. या सर्व घटनेमुळे आमचा कार्यक्रम पुढे ढकललाय अशी माहितीही मेटे यांनी दिली.
दुसरीकडे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोट दुर्घटनेवरून राज्य सरकारवर टीका केली. नुसत्या मोठमोठ्या घोषणा करून लोकांची फसवणूक सुरू आहे. लोकांच्या तोंडाला फक्त पानं पुसली जातायंत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाकरता राज्य गहाण ठेवू म्हणणारं हे राज्य सरकार ही स्मारकं कशी बांधणार ? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थितीत केलाय.
राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे सांगणारा आर्थिक अहवाल आलेलाच आहे. मुख्यमंत्र्यांनी आता सरकारचा उरलेला काळ नीट ढकलावा असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours