सातारा: खासदार उदयनराजे भोसले यांनी दुकान बंद करण्याच्या प्रकरणावर तोंडसुख घेतल्यानंतर आज शिवेंद्रराजे भोसले यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. माझ्या अन्यायाबाबत काळजी करू नये असं सणसणीत उत्तर शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना दिलंय. तसंच त्यांनी सुपारी घेण्याचे उद्योग बंद करावेत असा टोलाही लगावला. काही दिवसांपूर्वी दुकान हटवण्यावरुन दोन्ही राजे आमनेसामने आले होते. यानंतर दोन्ही राजांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
साताऱ्यातील देशी दारू दुकानाबद्दल झालेल्या वादानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी 'शिवेंद्रसिंहराजेंवरही अन्याय झाला तर मी खपवून घेणार नाही,' असं वक्तव्य केले होते. उदयनराजेंच्या या वक्तव्यानंतर शिवेंद्रसिंहराजेंनी प्रत्युत्तर दिले.
'देशी दारू दुकान बंद करण्याचा मुद्दा नसून खासदार उदयनराजे हे सुपारी घेऊनच जागा खाली करण्यासाठी आले होते,' असा दावा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.
तसंच त्यांनी माझ्यावरील अन्यायाची काळजी करू नये, अन्याय झाला तर मी कधीही शांत बसत नाही, हेही खासदारांनी लक्षात ठेवावे, अशी कोपरखळीही शिवेंद्रसिंहराजेंनी लगावली.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, 'साताऱ्यातील देशी दारू दुकान बंद करायचा विषय नव्हता. तर तेथील जागा खाली करण्याचा होता. त्यांचा हा नियोजित प्लॅन होता. देशी दारू दुकाने बंद करायची असतील तर त्यांनी आपल्या मतदारसंघातील सर्व दारू दुकाने बंद करावीत. तसंच पोलीस आणि आम्ही तिथे आल्यानेच त्यांचा हा डाव यशस्वी झाला नाही. मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. दुष्काळ पडला आहे, त्याकडेही खासदारांनी लक्ष दिले तर बरं होईल.'त्यांना जागा खाली करायची होती. या ठिकाणी पेढ्याचे दुकान असते तर खासदारांनी तेही खाली करण्याची भूमिका घेतली असती अशी टीकाही शिवेंद्रसिंहराजेंनी केली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours