जालना, 24 ऑक्टोबर : ‘ज्यांना स्वतःच्या वडिलांचं गेल्या 5 वर्षांत स्मारक बांधता आलं नाही ते अयोध्येत जाऊन काय राम मंदिर बांधणार,’ असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर अजित पवारांनी सडकून टीका केली.
‘भाजप शिवसेनेची राज्यात बनवाबनवी सुरू आहे. जनतेला सरकारकडून फक्त गाजर दाखवलं जात आहे,’ असं म्हणत अजित पवार यांनी राज्य सरकारवरही जोरदार टीका केली. जालना येथील समर्थ सहकारी कारखान्यातील गाळप शुभारंभ कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
‘मुंबई महानगरपालिकेसह राज्यातही सतेत्त असताना उद्धव यांना साधं बाळासाहेबांचं स्मारक बांधता येत नाही. आणि ते उद्धव ठाकरे आम्हाला शिकवतात,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावर सध्या आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्रात सत्तेवर असणाऱ्या भाजपला त्यांनी याच मुद्द्यावर धारेवर धरलं आहे. तसंच आपण 25 नोव्हेंबरला राम मंदिरासाठी अयोध्येला जाणार असल्याची घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
Post A Comment:
0 comments so far,add yours