मुख्य सम्पादिका: सुनीता परदेशी
राज्यातील दुर्गम भागात तसेच शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये आता फिरत्या दवाखान्यांमधून आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे. ‘फिरते वैद्यकीय उपचार केंद्र’ (Mobile Medical Unit)म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशा १० फिरत्या वैद्यकीय वाहनांचे आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यापैकी ५ फिरती वैद्यकीय वाहने मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये सेवा देतील. या फिरत्या वैद्यकीय वाहनांतील सर्व सेवा मोफत असेल.

वांद्रे येथील रंगशारदा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. सर्व मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून या फिरत्या वैद्यकीय वाहनांचे लोकार्पण केले.    

फिरत्या दवाखान्यांचा गोरगरीबांना होईल लाभ – मा. उद्धवसाहेब ठाकरे
यावेळी बोलताना मा. उद्धवसाहेब ठाकरे यांनी राज्याच्या आरोग्य विकासासाठी मागील चार वर्षात करण्यात आलेल्या प्रयत्नांचे कौतूक केले. ते म्हणाले की, राज्यात मागील काही वर्षात आरोग्य सेवेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे.टेलिमेडीसीनसारख्या सुविधा दुर्गम तसेच आदिवासी भागातील नागरीकांना वरदान ठरणार आहेत. राज्य शासनाने सुरु केलेल्या मोटारबाईक अँम्बुलन्स, बोट अँम्बुलन्ससारख्या उपक्रमांमुळे नागरीकांना जलदगतीने आरोग्य सुविधा मिळत आहेत. मुंबईत अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पोहोचणे कठिण असते. अशा ठिकाणी या मोटारबाईक अँम्बुलन्स सेवा देत आहेत. आज सुरु करण्यात आलेल्या फिरत्या दवाखान्यांचाही राज्यातील झोपडपट्ट्यांमध्ये तसेच आदिवासी, दुर्गम भागात राहणाऱ्या गोरगरीब नागरीकांना मोठा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी व्यापक प्रयत्न - मंत्री डॉ. दीपक सावंत
सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत म्हणाले, राज्यात आरोग्य सेवा प्रभावीपणे राबविण्यात आल्यामुळे बालमृत्यू दर १९ वर आला आहे. तो आणखी कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. मातामृत्यूही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. कर्करुग्णांसाठी सर्व सिव्हील रुग्णालयात केमोथेरपीची सेवा मोफत देण्यात येत आहे. मानसिक रोगांवर मात करण्यासाठी मेमरी क्लिनिक सुरु करण्यात येत आहेत. राज्यात २ सुपरस्पेशालीटी रुग्णालये सुरु करण्यात आली असून त्यात किडनी ट्रान्सप्लँटसारख्या मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. वृद्धांचे प्रश्न गंभीर आहेत. त्यांना प्रथमोपचार देणे तसेच त्यांचे समुपदेशन करण्यासाठी लवकरच सायकल अँम्बुलन्स सेवा सुरु करण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

१० फिरत्या दवाखान्यांचे झाले लोकार्पण
शहरांमधील दाट लोकवस्ती असणाऱ्या भागांमध्ये तसेच ग्रामीण दुर्मग भागामध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत हे फिरते दवाखाने चालविण्यात येणार आहेत. या अभियानांतर्गत १० फिरते दवाखाने कार्यरत असणार आहेत. यामध्ये मुंबईसाठी पाच तसेच नागपूर, नांदेड, औरंगाबाद, नवी मुंबई – पनवेल आणि कोल्हापूर या शहरांमध्ये एक मोबाईल मेडिकल युनिट गाड्या धावणार आहेत. या अभियानात वैद्यकीय सुविधांचा अभाव असणारी व साधारणपणे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या वस्त्यांची निवड करण्यात आली आहे. अशा निवड करण्यात आलेल्या परिसरात महिन्यातून एक किंवा दोन वेळा मोबाईल मेडिकल युनिट भेट देऊन तिथल्या गरजू लोकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवणार आहेत. प्रत्येक मोबाईल युनिट मध्ये १ डॉक्टर, १ नर्स, १ लॅब टेक्निशिअन, १ फार्मासिस्ट व १ वाहनचालक असा कर्मचारी वर्ग असणार आहे.

रक्त-लघवी तपासणीसह विविध सेवा मोफत
या फिरत्या दवाखान्यांमध्ये रक्त-लघवी तपासणी, उपचारात्मक आरोग्य सेवा, प्राथमिक उपचार, संदर्भसेवा, कुटुंबनियोजन, प्रसूतीपूर्व व प्रसुतीपश्चात माता व बालसंगोपन, लसीकरण, साथीचे रोग नियंत्रणात्मक कार्यक्रम, समुपदेशन, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी, आरोग्य व परिसर स्वच्छता याबाबत लोकजागृती इत्यादी सेवा पुरविण्यात येणार आहेत. या फिरत्या दवाखान्यातील सर्व सेवा मोफत असतील.  

यावेळी व्यासपीठावर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, आरोग्यसेवा आयुक्त अनुपकुमार यादव, आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. सतीश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours