 जिल्हाधिकारी शांतनू गोयल
 27 नोव्हेंबर पासून लसीकरण 
 लस अत्यंत सुरक्षित 
 5 आठवडे चालणार मोहिम 
भंडारा, दि. 16 :- गोवर आजाराचे दुरीकरण व रुबेला आजारावर नियंत्रण या मोहिमेंतर्गत जिल्हयातील शाळा व अंगणवाडीमधील 2 लाख 65 हजार 854 मुलामुलींना गोवर-रुबेला लस देण्यात येणार आहे. पाच आठवडे चालणाऱ्या या मोहिमेची सुरुवात 27 नोव्हेंबर पासून होणार असून यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. ही लस अत्यंत सुरक्षित असून जिल्हयातील प्रत्येक मुलांपर्यंत पोहचण्याचे प्रशासनाचे लक्ष आहे. 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना लसीकरण करावयाचे आहे. या मोहिमेत पालकांनी, शिक्षकांनी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी पत्रकार परिषदेत केले.
गोवर-रुबेला मोहिमेसंदर्भात माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधूरी थोरात,  जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, आय.एम.ए.चे डॉ. अशोक ब्राम्हणकर, डॉ. मेश्राम,  व डॉ. माधूरी माथूरकर यावेळी उपस्थित होते.
गोवर-रुबेला मोहिमेचा कालावधी 4 ते 5 आठवडयाचा असून पहिला व दुसरा आठवडा शैक्षणिक संस्था व शाळा आंगणवाडयामध्ये लसीकरण केले जाणार आहे. तिसऱ्या व चौथ्या आठवडयात आरोग्य सेवा संस्था आणि इतर बाहय संपर्क व मोबाईल संस्था याद्वारे तर पाचव्या आठवडयात गोवर-रुबेला लसीकरणापासून सुटलेल्या लाभार्थ्यांसाठी लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. भंडारा जिल्हयात 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील 2 लाख 65 हजार 854 मुलामुलींना लस देण्यात येणार आहे. ही लस 1428 शाळा व 1417 अंगणवाडयामध्ये देण्यात येणार आहे. यासाठी 1772 लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. 
या मोहिमेचा एक भाग म्हणून विद्यार्थी व पालकांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. या बैठकीत या मोहिमेविषयी जाणीव जागृती करण्यात आली आहे. गोवर-रुबेलाची लस अत्यंत सुरक्षित असून अपवादात्मकरित्या उदभवलेल्या प्रसंगासाठी तज्ञ डॉक्टरांची सुरक्षा चमु प्रत्येक ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहे. मोहिमेसाठी पुरेशी लस उपलब्ध झाली आहे. पालकांनी घाबरुन न जाता आपल्या मुलांना गोवर-रुबेला लसीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. 
  आरोग्य विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण या विभागामार्फत ही मोहिम जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत इंडियन मेडिकल असोसिएशन, रेडक्रास सोसायटी  इतर सेवाभावी संस्था यांचा सक्रीय सहभाग राहणार आहे. खाजगी शैक्षणिक संस्था व इंग्रजी माध्यमांच्या शाळा येथील शिक्षकांनी ही मोहिम राबविण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला आहे. 
या मोहिमेत ज्या विद्यार्थ्यांना लस दिली जाईल त्यांच्या बोटाला शाई लावून  लस दिल्याचे कार्ड देण्यात येणार आहे. सोबतच प्रत्येक लसीकरण केंद्रावर वैद्यकीय सुरक्षा किट उपलब्ध असणारआहे. ही मोहिम 100 टक्के यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आले असून पालक व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours