जनावरांच्या आहारात हिरव्या वैरणीचे महत्त्व

हिरव्या चाऱ्याने दुधात वाढ

भंडारा  :- पशुपालकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय म्हणजे जनावरांच्या आहारात हिरवा चारा. पशु आहारात चांगल्या प्रतिची हिरवी वैरण दिल्यास दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते ही बाब शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने समजावून सांगण्यासाठी पशुवैद्यकीय विभाग जिल्हा परिषदच्या वतीने जनावरांना सकस हिरवा आहार मिळावा व त्या माध्यमातून दूध उत्पादन वाढावे यासाठी जिल्ह्यातील 16 पशुवैद्यकीय दवाखान्यात वैरण बाग तयार करण्यात आल्या आहेत. वैरण बागेत 22 विविध प्रकारच्या वैरण पिकाच्या जाती लावण्यात आल्या आहेत.   
 जिल्ह्यातील 16 पशुवैद्यकीय दवाखान्यात 22 जातीच्या वैरणाची लागवड करण्यात आली असून ज्याद्वारे शेतकऱ्यांना आपल्या पशुधनासाठी हिरवा चारा उपलब्ध होत आहे. रुचकर चाऱ्यामध्ये भरपूर उत्पादन मिळवून देण्याची क्षमता असते. हायब्रीड नेपियर गवत, गिनी गवत, अंजन गवत, पांढरी मुसळी, दशरथ गवत, शेवरी, स्टायलो, छाया, लसूण गवत व दिनानाथ गवत असे हिरव्या वैरणीचे प्रकार आहेत. हा चारा जनावरांना नियमित दिल्यास दूध उत्पादन नक्कीच वाढते.
भंडारा जिल्हयातील सद्यस्थिती बघता जिल्हयातील शेतकरी  कमी पोषक तत्व असलेले तणीस पाळीव जनावरांसाठी चारा म्हणून वापरतात. त्यामुळे जनावरांना योग्य ती पोषक तत्वे योग्य त्या प्रमाणात मिळत नाहीत. त्याचा परिणाम जनावरांच्या प्रजनन व पैदास क्षमता, दुध उत्पादन, शरीर वाढ व प्रतिकार क्षमतेवर होतो. पर्यायाने शेतकऱ्यांचा तोटा होतो. ही बाब लक्षात घेऊन पशु संवर्धन विभागाने आत्माच्या माध्यमातून 16 पशुवैद्यकीय दवाखान्यात वैरण बागा विकसित केल्या आहेत. यासाठी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सतीश राजू व पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नितीन फुके यांनी पुढाकार घेतला आहे. 
 ‎       हिरव्या वैरणासाठी जिल्ह्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यात चारा बाग लावण्यात आली आहे. या बागेतून शेतकऱ्यांना वैरणीचे ठोंबे मोफत मिळणार आहेत. ज्या द्वारे शेतकरी आपल्या शेतात हिरवा उत्पादन करू शकतील. ज्याचा उपयोग करून दूध उत्पादनात वाढ करता येईल. हिरव्या चाऱ्यामुळे उत्पादनात दहा ते वीस टक्के निश्चित वाढ होते. ही सर्व प्रक्रिया शेतकऱ्यांना शास्त्रीय पध्दतीने समजावून सांगितली जात आहे. 32 दवाखान्यात अझोला हा जनावरांसाठीचा पूरक चारा लावण्यात येत आहे. अझोला ही शेवाळ प्रकारातील वनस्पती असून यामुळे दूध उत्पादनात 15  ते 20  टक्के वाढ होते. पशुधन असणाऱ्या शेतकऱ्यांनी हिरवा चारा उत्पादनाची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी पशु विभागाच्या वैरण बागेला आवश्य भेट द्यावी.

 ‎ हायड्रोपोनिक्स हिरवा चारा
मातीचा वापर न करता कमी पाण्यावर हायड्रोपोनिक्स हिरवा तयार करण्याची पद्धत खूप चांगली आहे. ज्यांच्या कडे जमीन नाही ते शेतकरी सुद्धा घरी हा चारा तयार करू शकतात. एक किलो मक्यामध्ये 9 ते 12 किलो हायड्रोपोनिक्स चारा तयार होतो. हा चार अतिशय पौष्टिक असून यामुळे दूध उत्पादनात मोठी वाढ होते.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours