शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी सरतं वर्ष सर्वात चांगलं राहिलं, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.  वर्षाअखेरीस सेनेनं हिंदुत्त्वाचा अजेंडा हाती घेतला. 'जय श्रीराम' म्हणत उद्धव यांनी, "मैं बालासाहब का लडका हुँ" हे दाखवून दिलं आहे.

अयोध्या दौरा

या सरत्या वर्षात उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला काय मिळालं तर आपसूक कुणीही सांगेल, सेनेला राम मंदिराचा मुद्दा मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा पूर्णपणे यशस्वी ठरला. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली. त्यानुसार, 25 नोव्हेंबरला उद्धव अयोध्येला रवाना झाले. उद्धव यांच्या दौऱ्याचे पडसाद देशभरात उमटले. सर्वच क्षेत्रातून उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा झाली. सोशल मीडियावर राम मंदिर आणि अयोध्या हा त्या दिवसातला सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला होता. एखाद्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्याची राष्ट्रीय पातळीवर घेतलेली ही मोठी दखल होती. विशेष म्हणजे, ठाकरे घराण्यात पहिल्यांदाच कुणी तरी राज्याबाहेर जाऊन अशा प्रकारे जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं. उद्धव यांच्या या झंझावातापुढे भाजपलाही बॅकफूटवर जावं लागलं. ' अब हर हिंदू की यही पुकार है, पहिले मंदिर फिर सरकार', अशा गर्जनेनं अयोध्यानगरी दुमदुमली. ही गर्जना दिल्लीच्या तख्ताला इशारा देणारी नक्कीच ठरली आहे. उद्धव ठाकरेंनी, 'राम मंदिर बांधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही', अशी घोषणा करत आगामी निवडणुकीत सेनेचा अजेंडा स्पष्ट केला आहे.

स्वबळाचा नारा

उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. मागील निवडणुकीत भाजपसोबत झालेली रस्सीखेच लक्षात घेऊन भाजपवर पहिल्यापासून दबाव टाकण्याचा प्रयत्न उद्धव यांनी केला आहे. मध्यंतरी सेना आणि भाजपमध्ये पालघर लोकसभा पोटनिवडणुकीवरुन चांगलेच मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे भाजपाध्यक्ष अमित शहांना 'मातोश्री'वर येऊन मध्यस्थी करावी लागली होती. सेना राम मंदिराच्या मुद्यावर आक्रमक झाली, तर दुसरीकडे पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा फटका बसला. जनतेच्या मनात काय चाललंय हे हेरून भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे

अमित शहा यांनी, आगामी निवडणुकीत सेनेसोबत युती शिवाय पर्याय नाही, असं स्पष्ट केलं. शहांच्या या भूमिकेमुळे सेनेला डावलणाऱ्या भाजप नेत्यांच्या शिडीतून हवा निघून गेली. सेनेचं पारडं सध्या जड आहे, त्यामुळेच कोणत्याही भाजप नेत्याला सेनेविरोधात बोलण्यास मज्जाव घातला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours