धुळे: धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जंगी सभा घेतली. सभेला गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे अशी सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी धुळे महापालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आणि घोषणांचा पाऊस पाडला. धुळे महापालिकेत गेली 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.

मुख्यमंत्री भाषणात म्हणाले,  धुळ्यात राज्य चालेल तर कायद्याचे, गुंडागर्दीचे नाही. धुळे भयमुक्त केले जाईल. केंद्रात भाजपा, राज्यात भाजपा आणि धुळ्यात गुंडांचे राज्य, असं चालणार नाही. विकासाची फळ चाखायची असतील, तर महापालिकेत भाजपचं सरकार पाहिजे.

धुळ्याचे नागरिक सोशिक आहेत. इथं पिण्याचं पाणी नाही, गटारीची अवस्था वाईट आहे, रस्ते नाहीत, पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी धुळ्याकडे दुर्लक्ष केलं.  महापालिका हे टक्केवारीचं ठिकाण बनवलं, आता परिवर्तनाची वेळ आली आहे तुम्ही धुळ्याची सत्ता द्या आणि विकासाची जबाबदारी माझ्यावर सोपवा असं आवाहनही त्यांनी केलं.

रेल्वे प्रकल्प, रस्ते प्रकल्प, डीएमआयसी यामुळं आता अनेक विकास कामं होत आहेत. त्यामुळे रोजगार संधी निर्माण होतील. धुळ्यातील अतिरिक्त कराच्या प्रश्नात सरकार लक्ष घालेल. त्यात सुसूत्रता आणण्यात येईल.

धुळ्यातील हद्दवाढीतील गावांसाठी विशेष आराखड्याला मंजुरी दिली जाईल. शहर बकाल असतील, तर तेथे गुंतवणूक येत नाही. आज केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर गुंतवणुकीचा वेग वाढला असून धुळ्याला उत्तम शहर बनवू असं आश्वासनही त्यांनी दिलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours