मुंबई, 08 डिसेंबर : भुज दादर एक्स्प्रेसमध्ये महिलांच्या डब्यात एका महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्यानं खळबळ माजली आहे. दादर इथं महिलांच्या डब्याची तपासणी करत असताना आरपीएफ जवानांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिलेचा मृतदेह आढळला आणि मोठी खळबळ उडाली.
दाडिया देवी चौधरी असं या महिलेचं नाव असून ती वडाळ्यातल्या आपल्या बहिणीकडे जात होती. सूरत इथून ती ट्रेनमध्ये चढली होती. शुक्रवारी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान या महिलेचा गळा कापून हत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे.
आरपीएफ टीमने महिलेचा मृतदेह रेल्वेच्या डब्यातून ताब्यात घेतला असून तो आता शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर आरपीएफने सांगितल्याप्रमाणे महिलेच्या अंगावर अर्धेच कपडे होते. मारेकऱ्यांनी तिला मारल्यानंतर तिचा मृतदेह साडीने झाकून ठेवला असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मुंबई सेंट्रलच्या आरपीएफने या खळबळजनक हत्येचा कसून तपास करण्यास सुरूवात केली आहे. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करताना बोरिवली इथं चार महिला डब्यातून उतरताना दिसत आहे. तर इतर स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.
हे प्रकरण चोरी आणि हत्येचं असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र यांच्यानुसार मृत महिला दाडिया देवी शंकर चौधरी (40) सूरतहून मुंबईसाठी रवाना झाली होती. महिला एका कपड्याच्या दुकानात काम करते. तिला 2 मुली आणि एक मुलगा असल्याचंही शैलेंद्र यांनी सांगितलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours